बेळगाव लाईव्ह : गेल्या ६६ वर्षांपासून कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा आहे. यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून अनेक आंदोलने, चळवळी उभारल्या गेल्या.
येथील कर्नाटक सरकारच्या अन्यायाला आणि अत्याचाराला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून प्रत्येक निवडणूक लढविली जाते. मात्र या निवडणुकीत समिती आणि मराठी भाषिकांना पाठिंबा देण्याऐवजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करण्यासाठी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर सीमावासियांच्या तीव्र लोकेच्छा प्रकट करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
या पात्रात सीमाभागात महाराष्ट्रातून निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या नेत्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी समितीमध्ये असलेल्या बेकीमुळे समिती नेत्यांवर बोट करून दाखविले जायचे.
मात्र समिती नेत्यांमध्ये आता एकी झाली असून महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमावासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिवाय महाराष्ट्रातून समितीच्या उमेदवारांविरोधात जे नेते प्रचारासाठी येतात, त्यांच्याविरोधात ठोस भूमिका घेण्याची मागणीही रवी साळुंखे यांनी पत्राद्वारे केली आहे.
बेळगाव महापालिकेच्या दक्षिण भागातले एकमेव नगरसेवक असलेले रवी साळुंखे हे पूर्वाश्रमीचे मनसेचे कार्यकर्ते आहेत राज ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक आहे त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून बेळगाव विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे.