Wednesday, December 25, 2024

/

समितीचे अस्तित्व टिकविण्यासाठी… आज नाही तर कधीच नाही!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणूक आता चरणसीमेवर आलेली आहे. प्राथमिक अवस्थेतील टप्पे आता पूर्ण होत चालले आहेत. अनेक पक्षाचे उमेदवार कोण असतील? याचे तर्क वितर्क जरी बांधले जात असले तरी जवळ जवळ उमेदवार कोण असणार हे निश्चितीयापर्यंत पोहोचलेले आहे. काँग्रेसने काही प्रमाणात कमकुवत उमेदवार, भाजपमधील सुंदोपसुंदी या दोन्ही गोष्टींमुळे समितीची बाजू वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

एकंदर महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ३० ते ४० हजार असा स्वतःचा मतदार असला तरी विजयासाठी अजून २० ते ३० हजार मतदार खेचून आणणे गरजचे आहे. याप्रसंगी जो उमेदवार तगडा असेल, ज्याच्याकडे अशापद्धतीच्या मतदार खेचून आणण्याची क्षमता असेल, अशा उमेदवाराला जर उमेदवारी दिली तर निश्चितच समितीचे उमेदवार निवडून आणण्याची दाट शक्यता आहे. परंतु समितीच्या काही लोकांच्या इच्छाशक्ती आणि एकंदर त्यांच्या कार्यप्रणालीवर मतदार आणि मराठी भाषिकांना शंका उपस्थित होत आहे. कारण समिती जिंकून येण्यापेक्षा त्यांचे हितसंबंध ज्यांच्याशी जोडलेले आहेत, त्यांच्या हितासाठी काहींचे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मागील अनेक दिवसांपासून मराठी भाषिकात अशा नेत्यांनी केलेल्या एकंदर ‘योगायोगाच्या’ चर्चा बऱ्याच रंगात आलेल्या आहेत. समितीमधील काही नेते कुणाची तळी उचलतात हे आता उघड झालेले आहे. काही लोकांनी ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचे पैसे आणून वाटप केले असे त्यांच्यावर थेट आरोप झालेले आहेत. आणि ते काही अंशी सत्य असण्याची शक्यता आहे. आजही ग्रामीण भागातील मतदार त्यांच्या नावाने खडे फोडत आहे. याचप्रमाणे दक्षिण मतदार संघात आजपर्यंत कमकुवत उमेदवार देण्याची शक्यता निर्माण करण्याची एक प्रक्रिया एका गटाकडून राबविली जात आहे.कारण त्यांचे संबंध तेथील आमदारांशी जुळलेले आहेत, असे काहींचे स्पष्ट मत आहे. त्याचप्रमाणे एकंदर समितीची निवड प्रक्रिया पारदर्शीपणे केली जात नाही, असाही आरोप होत आहे. संघटनात्मक बाबींचा विचार करता, जर या निवडणुकीत योग्य उमेदवाराला उमेदवारी मिळाली तर निश्चितच समितीचा विजय होईल, यात काही शंका नाही. तरी मतदार मात्र संभ्रमावस्थेत आहेत.

उत्तर, दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर मतदार संघात योग्य उमेदवाराची निवड आणि सर्वंकष पद्धतीने, निरपेक्ष वृत्तीने जर प्रचार झाला तर समिती नक्कीच एखादा चमत्कार घडवेल, अशा पद्धतीचा लोकमानस आहे. समितीने निपाणी आणि यमकनमर्डी मतदार संघातही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे. पण याठिकाणी देखील उमेदवार निवड करताना कोणत्याही पद्धतीचे राजकीय हितसंबंध असणाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये, अशा पद्धतीचा एक मतप्रवाह जनतेतून पुढे येत आहे. कारण समितीतील काही लोक अशापद्धतीने ‘जुगाड’ करण्यात प्रसिद्ध आहेत! असे ‘पावशेर’ नेते कोण आहेत? हे जगजाहीर आहे. अशा पावशेर लोकांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

एकंदर समितीची विश्वासार्हता हकनाक कमी करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांना आताच आवरले नाही तर समितीची परिस्थिती आणखी नाजूक होईल, यात काही शंका नाही. जर लढा जिंकायचा असेल, मराठी माणसाचे हित जोपासायचे असेल, मराठी माणसाला चांगल्या स्थानावर, उंचीवर न्यायचे असेल, तर समिती नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थीपणाला आवर घालायलाच हवा, हे मराठी भाषिकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.