आर्थिक वर्ष समाप्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे उद्या 31 मार्चपर्यंत आपापला कर जमा करण्यासाठी व्यापारी उद्योजकांची सध्या धावपळ उडाली आहे. मात्र अशा परिस्थितीत कांही बँकांमध्ये सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून कराची रक्कम जमा करून घेण्यास असमर्थता दर्शवली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यंदाचे आर्थिक वर्ष समाप्त होत आले असल्यामुळे आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्यापारी उद्योजक वगैरे मंडळींची सध्या धावा धाव सुरू आहे. गेल्या कांही महिन्यापासून सर्व चार्टर्ड अकाउंटंट मंडळी आणि त्यांचे सहाय्यक आपल्या क्लायंटचा हिशेब व्यवस्थित मांडण्यात व्यस्त आहेत. आता उद्याची 31 मार्च ही कर भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे संबंधित सर्वांचीच कर भरणा करण्यासाठी धावा धाव सुरू असताना सध्या कांही बँकांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून कराची रक्कम भरून घेण्यास असमर्थता दर्शवली जात आहे.
खरे तर दरवर्षी अंतिम मुदतीच्या वेळी कर भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बँका आणि संबंधित खात्यांनी करदात्यांच्या हितासाठी सर्व्हर वगैरे आपापली यंत्रणा सुसज्ज ठेवली पाहिजे. सध्या बँकांमध्ये सर्व्हर डाऊनची जी समस्या सांगितली जात आहे, त्याचा फटका वेळेत कर अदा न केल्यास करदात्यांना बसणार आहे. तेंव्हा याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उद्यमबाग परिसरातील असंख्य करदात्यांकडून केला जात आहे.
सरकारने केलेल्या जनतेच्या गोची बद्दल बोलताना उद्योजक म्हणत आहेत की आपला देश व्यापारी आणि उद्योजकांवर चालतो. कोरोना प्रादुर्भाव काळात कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.
मात्र त्यावेळी व्याज बंद करण्यात आले होते का? आज सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे आमचे कर भरणे तर थांबलेच आहे, शिवाय वेळेचा अपव्यय येऊन आमचे जे नुकसान झाले आहे त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.