बेळगाव लाईव्ह : ऋतुमानात होत असलेला बदल, उन्हाच्या वाढत्या झळा, वाढत्या उन्हामुळे धरणासह जलस्रोतांनी गाठलेला तळ, पाणीटंचाई या समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांना कोलमडलेल्या पाणी नियोजनाला तोंड द्यावे लागत आहे. अशातच बेळगावकरांना होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे सांसर्गिक आजार देखील बळावले आहेत.
वातावरणात सातत्याने होत असलेले बदल आणि दूषित पाणीपुरवठा यामुळे बेळगावमधील बहुतांशी दवाखान्यात सर्दी, खोकला, थंडी-ताप यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
वार्षिक परीक्षेची वेळ असून अनेक विद्यार्थ्यांनाही या सांसर्गिक रोगांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोविडमुळे सर्दी-खोकल्यासारख्या आजारांनी भयभीत झालेल्या नागरिकांना नवा H3N2 विषाणू भीती घालत आहे.
अशातच सर्दी-खोकला-ताप यासारख्या लक्षणांच्या रुग्णात मोठी वाढ झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दवाखान्यांमध्ये अशा लक्षणांच्या रुग्णांची गर्दी दिसून येत असून शहरात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना घशाचे विकारदेखील सुरु झाल्याच्या तक्रारी ऐकू येत आहेत. शहराच्या कोलमडलेल्या पाणी नियोजनाबाबत केवळ आश्वासने आणि भाषणे ऐकू येत आहेत.
नव्याने शपथविधी झालेल्या महापौरांच्या कक्षात यावर चर्चा, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र वायरल फीव्हरने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या आरोग्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असलेले पाहावयास मिळत आहे.