बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आज पुन्हा अवैज्ञानिक पद्धतीने घालण्यात आलेल्या गतिरोधकामुळे एका तरुणाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे.
महांतेश नगर येथे सदर घटना घडली असून प्रतीक फकीराप्पा नामक २३ वर्षीय तरुणाचा नव्याने घालण्यात आलेल्या गतिरोधकाकडे लक्ष न गेल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून पुढे टिप्परला धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.
सदर गतिरोधक महांतेश नगर येथील सेक्टर क्रमांक १२ मध्ये कालच घालण्यात आला होता. मात्र या गतिरोधकांकडे लक्ष न गेल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने काही मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला सदर तरुणाने धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रात्री उशिरा हा अपघात घडल्याने कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, पहाटे ५.३० च्या सुमारास मंदिरात जाणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाच्या नजरेस हि बाब आली. मृत प्रतीकांच्या कुटुंबियांना हि माहिती देऊन रुग्णवाहिकेला फोन करण्यातला.मात्र तोपर्यंत सदर तरुणाचा जीव गेला होता.
महांतेश नगरच्या अनेक भागात अशास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले असून यामुळे अनेकांच्या मणक्यांचे आजार डोके वर काढत आहेत. शिवाय या भागात वारंवार अपघात होत आहेत. यामुळे येथील रहिवासी संताप व्यक्त करत असून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे या भागात टिप्पर व इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी न करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच उशिरा प्रशासनाला शहाणपण सुचले असून ताबडतोब सदर गतिरोधक हटविण्यात आला आहे. सदर प्रकाराबाबत महांतेश नगर रहिवाशांनी संताप व्यक्त करत बेजबाबदार अधिकारी, कंत्राटदार आणि संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.