बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात विधानसभा निवडणुकीत कर्तव्य बजाविण्यासाठी नेमलेल्या विभागीय अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी विभागीय अधिकाऱ्यांना शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडावी, कोणत्याही गोंधळात न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपले कर्तव्य चोख बजावावे अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, निवडणूक व्यवस्थापन हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नवीन एम्-३ मशीन आधीच आली आहेत. मशिन्सबाबत अधिकाऱ्यांना आगाऊ माहिती देण्यात यावी, निवडणूक कर्तव्यासाठी नव्याने नियुक्त झालेल्यांनी दक्षतेने कर्तव्य बजावावे, मतदाराला मतदान केंद्र क्रमांकाची माहिती द्यावी. शहरी भागात जास्त शाळा असल्याने मतदार गोंधळून जाऊन मतदान करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी बीएलओंकडून माहिती घेऊन मतदान केंद्र क्रमांक, माहिती, तिकिटावर लिहून मतदारांचा संभ्रम दूर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
शहरी भागात 1500 मते असलेले मतदान केंद्र आणि 1200 पेक्षा जास्त मते असल्यास ग्रामीण भागात नवीन मतदान केंद्र उभारावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांकडून आमिष व दडपशाही असलेल्या संवेदनशील भागांना भेटी देऊन मतदारांमध्ये जागृती करावी. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी बीम्स प्रशासक प्रीतम नसलापुरे यांनीही अधिकाऱ्यांना सल्ला आणि सूचना दिल्या. या प्रशिक्षण कार्यशाळेत महानगरपालिका अधिकारी रुद्रेश घाळी, बेळगावचे उप उपविभागीय अधिकारी बलराम चव्हाण, बिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद बेल्लारी, जिल्हा पंचायत मुख्य लेखापाल परुशराम दुडगुंटी तसेच निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते.