बेळगाव लाईव्ह : शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात सुरु करण्यात आलेल्या शिवचरित्र येथे मनमोहक द्रुकश्राव्य कलाकृतीचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास याठिकाणी उलगडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय, साहसी जीवनचरित्राचे सादरीकरण येथील कलाकृतींसह प्रेक्षकांना ऐकताही येणार आहे. अप्रतिम प्रकाश योजना आणि ध्वनी व्यवस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते त्यांच्या अजरामर पराक्रमाच्या कर्तृत्वाची सर्व माहिती याठिकाणी मिळणार आहे.
शिवचरित्र येथे सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ब्लूटूथच्या मदतीने ध्वनी – चित्रपटाचे सादरीकरण करण्याचा विचार सुरु असून यासाठी १० रुपये इतका अत्यंत माफक प्रवेश शुल्क ठेवण्यात आला आहे. कन्नड आणि मराठी अशा दोन्ही भाषेत लाईट आणि साउंड शो ची व्यवस्था करण्यात आली असून संध्याकाळी ६.३० वाजता कन्नड भाषेत आणि ७.४५ वा. मराठी भाषेत ४५ मिनिटांच्या कालावधीसाठी हा शो प्रेक्षकांसाठी दाखविण्यात येणार आहे. यासाठी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत.
याठिकाणी भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना काही नियम आणि अटी घालण्यात आल्या असून याठिकाणी मोबाईल, लॅपटॉप घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शिवचरित्राबाहेर मोबाईल आणि लॅपटॉप ठेवण्यासाठी लॉकरची सोय करण्यात आली असून प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहे. शिवचरित्राच्या आत मोबाईल किंवा लॅपटॉप आढळून आल्यास सदर वस्तू जप्त करण्यात येणार आहेत. शिवचरित्रात सुरु असणाऱ्या सादरीकरणाचे रेकॉर्डिंग करण्यास सक्त मनाई असून याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षाही देण्यात येणार आहे.
संपूर्ण शिवचरित्र सीसीटीव्हीच्या निगराणी खाली असेल. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शांतता राखावी, तंबाखू, गुटख्याचे सेवन करून प्रवेश करू नये, असे नियम ठरविण्यात आले आहेत. याठिकाणी आयोजित केलेला शो पाहण्यासाठी ब्लूटूथ उपकरणे देण्यात येणार आहेत. एकंदर अशी चोख व्यवस्था याठिकाणी करण्यात आली असून शिवरायांचा जीवनप्रवास अनुभवण्याची पुन्हा एक संधी बेळगावकरांना मिळणार आहे.