Tuesday, January 28, 2025

/

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा

 belgaum

बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला तात्काळ आळा घालून त्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त केला जावा. अन्यथा भटक्या कुत्र्यांच्या विरोधात नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.

माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांना सादर केले. आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहरासह विस्तारित नागरी वसाहतीमध्ये अलीकडे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येला वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमातून सातत्याने वाचा फोडली जात आहे. अलीकडेच गेल्या 24 फेब्रुवारी रोजी एका 5 वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्याला जखमी करण्याबरोबरच फरपटत नेण्याचा प्रयत्न केला.

त्या बालकाच्या मदतीस धावलेल्या नागरिकांवर देखील त्या कुत्र्याने हल्ला केला. या पद्धतीच्या घटना शहरात सातत्याने घडत असून काहींना प्रसिद्धी मिळते तर काहींना नाही. शहर उपनगरात रात्री 11 नंतर रस्त्यावर वावरणारी भटकी कुत्री ये -जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात असतात. पहाटेच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वॉकर्सना देखील या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागतो. कळपाने वावरणारी ही कुत्री अचानक एखाद्यावर हल्ला करतात. त्यामुळे एकट्या दुकट्या व्यक्तीची अवस्था असहाय्य होऊन त्याची कुत्र्याच्या कचाट्यातून आपली सुटका करून घेताना पुरे वाट होते.Gunjatkar

 belgaum

मागील वर्षी महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून पुन्हा त्यांना त्यांच्या मूळ जागी पुन्हा मोकाट सोडले होते. तीच कुत्री आता नागरिकांसाठी धोकादायक बनली आहेत. या कुत्र्यांच्या भीतीमुळे लहान मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडेनाशी झाली आहेत. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त केला जावा. गुरांच्या कोंडवाड्याप्रमाणे या कुत्र्यांसाठी कोंडवाडा निर्माण करून शहरातील उपद्रवी कुत्र्यांची त्या ठिकाणी रवानगी केली जावी.

येत्या चार-पाच दिवसात या मागणीची पूर्तता न झाल्यास नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या विरोधात नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मनपा आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.