Wednesday, January 15, 2025

/

अनगोळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची महापौरांकडे मागणी

 belgaum

शहराच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनगोळ भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे येथील रहिवाशांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून ही समस्या तात्काळ सोडवावी, अन्यथा नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी एका निवेदनाद्वारे महापौरांना दिला आहे.

माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आज शनिवारी सकाळी महापालिकेमध्ये महापौर शोभा सोमनाचे यांची भेट घेऊन अनगोळ मधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. तसेच उपरोक्त मागणीची निवेदन त्यांना सादर केले. महापौर आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या सुमारे 14 वर्षापासून आमच्या अनगोळ भागाला क्षुल्लक व्यत्यय वगळता 24 तास पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत होता. त्या व्यत्ययमुळे थोडा त्रास झाला तरी नागरिक मिळणाऱ्या पाण्यावर समाधानी होते.

पूर्वी शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी व्हीओलिया कंपनीवर होती आणि त्यांच्याकडून व्यवस्थित पाणीपुरवठा केला जात होता. मात्र आता शहर पाणीपुरवठा व्यवस्था एल अँड टी कंपनीकडे हस्तांतरित केल्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होत असल्यामुळे नागरिकांनी अंडरग्राउंड अथवा ओव्हरहेड टॅंकच्या स्वरूपात पाणी साठ्याची व्यवस्था केलेली नाही. घरातील घागरी, पातेल्यांमध्ये पाण्याचा साठा करून ठेवला जात असे. आमच्या अनगोळ भागात तर खुल्या विहिरी देखील नाहीत.

कॅम्प येथील ग्लोब टॉकीज म्हणजे मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून आमच्या भागाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या खेरीज एल अँड टी कंपनीकडून हा पाणीपुरवठा अवघ्या एक तासासाठी केला जातो. तो देखील पहाटे मध्यरात्री केव्हाही मनमानी केला जात असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.

सध्याच्या कठीण परिस्थितीत मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना 500 ते 600 रुपये मोजून पाण्याचा टँकर मागवणे परवडत नसल्यामुळे त्यांची मोठी कुचंबना होत आहे. लोकांना पाच दिवसातून एकदा अथवा आठवड्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने बेळगावची संपूर्ण जनता सध्या एल अँड टी कंपनीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर नाराज आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन आपण एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित वेळेवर करण्याची सूचना करावी.

पाणीपुरवठा लवकरात लवकर वेळेवर सुरळीत सुरु न झाल्यास नागरिकांना नाईलाजाने आंदोलन छेडावे लागेल, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक गुंजटकर यांच्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.