मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नसलेले 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना टपालाद्वारे घरातूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टपाल मतपत्रिका वितरण मतदान आणि प्रक्रिये संबंधी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर काल सोमवारी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
एकदा ऐच्छिक टपाल पत्रिका मिळविलेल्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास परवानगी नसेल. ऐच्छिक टपाल मत अशी नोंद प्रशासनाकडे झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक संबंधितांच्या घरी जाऊन त्यांना मतदान करण्याची संधी देईल. या पथकामध्ये दोन मत अधिकारी, मायक्रोऑब्झर्वर, पोलीस अधिकारी आणि एक छायाचित्रकार अशा पाच जणांचा समावेश असेल. संबंधित मतदारांना एसएमएसद्वारे आगाऊ कल्पना देऊनच ते त्यांच्या घरी जातील. तेथे पोहोचल्यानंतर ओळखपत्र अन्य कागदपत्रांची तपासणी करून मतदानाची संधी दिली जाईल.
मतदानानंतर अधिकारी सदरील मतपत्रिका अधिकृत लीफाफ्यात ठेवून मोहोर बंद करतील. निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत तो लिफाफा मतमोजणी केंद्राकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पुढे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे सदर मतदान प्रक्रिया निवडणुकीपूर्वी किमान 10 दिवस आधी सुरू करून मतदानाच्या एक दिवस आधी पूर्ण करावी. टपालाद्वारे मतदानाची गुप्तता काटेकोर पाळावी. कोणत्याही कारणाने ही मतदान प्रक्रिया उघड होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संपूर्ण मतदान प्रक्रियेचा व्हिडिओ तयार करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.