बेळगाव लाईव्ह : विज्ञानाने पार अंतराळापर्यंत जाऊन संशोधन केले तरी अद्याप अंधश्रद्धा आणि अनेक गूढ गोष्टींची उकल करता येणे शक्य झाले नाही. अजूनही लोक भूतबाधा, करणीबाधा यासारख्या गोष्टींमध्ये अडकून पडले आहेत. बेळगावमध्ये आजवर अशा अनेक घटना पाहायला, ऐकायला मिळाल्या आहेत.
अनेक घटनांमुळे नागरिकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. सध्या बेळगाव तालुक्यातील सावगाव या गावातदेखील अशाचपद्धतीची दहशत निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.
रात्री ११ च्या नंतर पहाटे ४ च्या दरम्यान गावात विविध ठिकाणी जोरजोरात किंचाळण्याचे आवाज ऐकू येत असून या आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी शेत-शिवारातील कामे आटोपून गावात गप्पा मारणाऱ्या नागरिकांमध्ये सध्या याच आवाजाची चर्चा सुरु आहे. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर या आवाजाच्या ऑडिओ क्लिप्स तुफान वायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो असो किंवा व्हिडीओ किंवा ऑडिओ हा वाऱ्याच्या वेगापेक्षाही वायरल होतो. तसाच प्रकार सावगावमधील प्रकारचा होत असून मंगळवारी दिवसभर सावगाव मधील ऑडिओ क्लिपची संपूर्ण बेळगावमध्ये चर्चा सुरु होती. अनेकांनी हे ऑडिओ क्लिप्स वॉट्सअप स्टेटसवर देखील अपलोड केले आहेत.
या गावातील बहुसंख्य नागरिक या आवाजामुळे भयभीत झाले असून रात्रीच्या वेळी संपूर्ण गावात भीतीमुळे शुकशुकाट पसरत आहे. अनेकांनी हा आवाज स्वतः ऐकल्याचा दावा केला आहे तर काहींनी एकमेकांच्या सांगण्यावरून या आवाजाची दहशत मनात बाळगली आहे. प्रत्येक ४ ते ५ दिवसांच्या अंतरावर हा आवाज ऐकू येत असून नेमका हा आवाज वन्यप्राण्यांचा आहे कि माणसाचा आहे? कि कुणीतरी जाणीवपूर्वक गावात दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार सुरु केला आहे? याचे उत्तर ग्रामस्थ शोधत आहेत.
अनेकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊन नेमका हा आवाज कशाचा आहे याचाही सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्नही केला. परंतु अद्याप या शोधात यश आले नाही. गेल्या २ महिन्यांहून अधिक काळ हा प्रकार सुरु असून संपूर्ण गाव या आवाजामुळे दहशतीच्या वातावरणात राहात आहे.