बेळगाव लाईव्ह : प्राप्तिकर विभागाकडून आधार कार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली असून येत्या ३१ मार्च पर्यंत आधाराला पॅन लिंक न झाल्यास १ एप्रिलपासून पॅनकार्ड निष्क्रिय करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आधार-पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे.
आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आजवर मुदतवाढ करून दिली होती. मात्र कित्येक नागरिकांनी अद्यापही आधार कार्डला पॅनकार्ड लिंक केले नसून आता १ एप्रिलपासून पॅनकार्ड निष्क्रिय होणार असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर तसेच आता १००० रुपये दंड आकारण्यात येत असून नागरिक आधार-पॅन लिंक करण्यासाठी धावपळ करत आहेत.
ज्यांचे आधारकार्डला पॅनकार्ड लिंक नाही, त्यांना एक हजार रुपये दंड आकारला जात आहे. पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करून घेण्यासाठी सायबर कॅफेवर गर्दी वाढली आहे. लिंक प्रक्रियेसाठी सायबर कॅफेधारक दोनशे ते पाचशे रुपये आकारत आहेत. कित्येक नागरिकांच्या आधार कार्ड मधील आणि पॅनकार्ड मधील माहितीत तफावत असल्याने अनेकांची तारांबळ उडत आहे. यामुळे नावाची दुरुस्ती करून आधाराला पॅनकार्ड लिंक करून घेण्यासाठी नागरिकांना कागदपत्र जमविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
आपले पॅनकार्ड आधारकार्डला लिंक आहे वा नाही, याबाबत शहानिशा करून घेण्यासाठी http://eportal.incometax.gov.in/ies/ foservice/#pre-login/link-aadhaar-status या संकेतस्थळाला भेट द्यावी,
तसेच http:// eportal.incometax.gov.in/ies/foservice/#pre-login/bl-link- aadhaar या लिंकवर क्लिक करून पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी वापर करावा. ३१ मार्चपर्यंत आधार-पॅन लिंक करून घेण्यात आल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतर वाढीव दंड रक्कम भरावी लागेल, असा इशारा देण्यात येत आहे.