बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळ प्रगतीपथाकडे झेपावत असतानाच अचानकपणे रद्द झालेल्या अनेक विमानसेवांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. दरम्यान या समस्येचा पाठपुरावा करत डॉ. प्रभाकर कोरे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी पत्रव्यवहार करून बेळगाव विमानतळावरून उड्डाणसेवा पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली होती. या विनंतीवरून प्रवाशांची मागणी आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या आधारावरून ठराविक ठिकाणी बेळगाव विमानतळावरून अधिकाधिक विमान सेवा सुरु करण्याची ग्वाही दिली आहे.
बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सध्या इंडिगो आणि स्टार एअर कंपन्या बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, इंदूर, जोधपूर, नागपूर, सुरत आणि तिरुपती याठिकाणी दर आठवड्याला ८४ फेऱ्या करत आहेत. आरसीएस – उडाण योजने अंतर्गत सुरु असलेल्या विमानसेवा काही कालावधीनंतर कमी झाल्याने बेळगाव विमानतळावरील विमानांची रहदारी कमी झाली. अलायन्स एअर या कंपनीने उडाण योजने अंतर्गत बेळगाव ते पुणे अशी सेवा सुरु केली होती.
मात्र ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हि सेवाही बंद झाली. याचप्रमाणे घोडावत कंपनीची विमानसेवा बेळगाव ते नाशिक दरम्यान सुरु होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हि सेवादेखील स्थगित झाली आहे. सदर सेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. विमान कंपनीच्या अंतर्गत समस्यांमुळे बेळगाव आणि म्हैसूर दरम्यानची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. बेळगाव ते दिल्ली आणि चेन्नई हा मार्ग ६०० कि.मी. टप्प्यापेक्षा जास्त असल्यामुळे या मार्गावरील सेवा उडाण अंतर्गत येत नाही.
व्यावसायिक उड्डाण संचालनासाठी, मार्च १९९४ मध्ये एअर कॉर्पोरेशन कायदा रद्द करून, भारतीय देशांतर्गत विमान वाहतूक नियंत्रणमुक्त करण्यात आली. त्यामुळे, या संदर्भात विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या अधीन रहदारीची मागणी आणि व्यावसायिक व्यवहार्यता यावर अवलंबून विशिष्ट ठिकाणी हवाई सेवा प्रदान करणे हि बाब एअरलाइन्सवर अवलंबून आहे.
बेळगावच्या विमानतळाची होत असलेली अधोगती याला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप होत होता. दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे पुन्हा बेळगाव विमानतळ प्रगतीपथावर येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.