महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना मज्जाव करणारे महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेताच नरमल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत नेहमीच आडमुठी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. याचाच प्रत्यय आजही आला. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. बैठक सुरू होण्यापूर्वी आयुक्त डाॅ. घाळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सभागृह बाहेर जाण्याचे सांगू लागले. आयुक्तांनी तावा तावा ने घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित पत्रकारही चक्रावले. यापूर्वी अशा बैठकांचे वृतांतन करण्यास कोणतेच निर्बंध घालण्यात आलेले नव्हते, मग आत्ताच असे का? असा जाब पत्रकारांनी आयुक्तांना विचारला. मात्र पत्रकारांची बाजू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसलेल्या आयुक्तांनी पत्रकारांना बाहेर काढण्याची री ओढणे कायम ठेवले.
योगायोगाने त्याच वेळी शहराच्या दोन्ही आमदारांचे सभागृहात आगमन झाले आहे. त्यावेळी पत्रकारांनी आमदारांना जाऊन विचारा पत्रकारांना बैठकीचे वृत्तांत करण्याचे येते की नाही असा सल्ला आयुक्तांना दिला. त्यानंतर आयुक्त डाॅ. घाळी आमदारांकडे गेले त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या आसनावर जाऊन बसले. त्यानंतर रीतसर सुरू झालेल्या बैठकीत सभागृह सचिव भाग्यश्री हुग्गी यांनी महापौर उपमहापौर आणि आमदारांसह पत्रकारांचेही स्वागत केले.
या पद्धतीने आयुक्तांना घरचा आहेर मिळाल्यामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होत होते. तथापी आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत केलेले आजचे वर्तन सर्वांच्याच चर्चेचा आणि संतापाचा विषय बनला होता.