बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक इच्छुकांनी फिल्डिंगही लावली असून हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा इच्छुक उमेदवार करत आहेत. दरम्यान, काँग्रेसमधून इच्छुकांची यादी जाहीर झाली असून या यादीतून माजी आमदार रमेश कुडची यांना डावलण्यात आल्याचे दिसून आले आहे.
माजी आमदार रमेश कुडची यांनी इच्छुकांच्या यादीत नाव नोंदविताना रीतसर अर्ज देत काँग्रेस पक्षाच्या इमारत निधीसाठी २ लाख रुपयांची देणगीही दिली आहे. रमेश कुडची यांनी यापूर्वी चारवेळा नगरसेवक पद, दोनवेळा महापौर पद तर दोनवेळा आमदारपद भूषविले आहे. २०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण विधानसभा मतदार संघातून त्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज सादर केला होता.
गेल्या वर्षभरातील कामाचा लेखाजोखा केपीसीसीकडे सादर करून दक्षिण विधानसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे दिसून आले
असून याप्रकरणी आपल्यावर अन्याय झाला असल्याची लेखी तक्रार रमेश कुडची यांनी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि सरचिटणीस रानदीपसिंग सुरजेवाला यांच्याकडे केली आहे.