आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटा करिता 7 जण इच्छुक असल्यामुळे आशा उंचावलेल्या काँग्रेसने यावेळी कडवी झुंज देऊन या मतदारसंघात इतिहास निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. तथापि हाय कमांडकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणे बाकी असल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमधील उत्सुकता शिगेला पोचली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक उमेदवार निवडण्यात आला असला तरी अंतर्गत कलहामुळे दक्षिण मतदार संघातील समितीच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघ हा गेल्या 2008 साली अस्तित्वात आला. जेंव्हा भारताचा निवडणूक नकाशा नव्याने तयार करण्यात आला.
त्यावेळी 2008 च्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अभय पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार किरण सायनाक यांना 12,990 मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर 2013 मधील निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार संभाजी पाटील यांनी भाजप उमेदवार अभय पाटील यांना 6310 इतक्या कमी मत फरकाने पराजित केले होते. पुढे 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार एम. डी. लक्ष्मीनारायण यांना तब्बल 58 हजार 692 मतांनी पराभूत करून अभय पाटील पुन्हा विजयी झाले होते.
मागील निवडणुकांमध्ये या मतदार संघात काँग्रेसमुळे कोणताही मोठा फरक पडला नाही. तथापि मास्टर माईंड राजकारणी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी या मतदारसंघात खास लक्ष दिले असल्यामुळे यावेळी येथील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. गेल्या 2021 च्या लोकसभा पोट निवडणुकीमध्ये जारकीहोळी यांनी या मतदारसंघात चांगली मते मिळवली होती. तेंव्हापासून त्यांनी समाधानकारक संख्येत आपले समर्थक निर्माण केले आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघात सुमारे 80 हजारहून अधिक मराठा मतदार असून विणकर मतदारांची संख्या 30 हजाराहून अधिक आहे तसेच जवळपास 10 हजार लिंगायत मते आहेत. याव्यतिरिक्त अल्पसंख्यांक आणि इतर समुदायाचे जवळपास 40 हजार मतदार आहेत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी सात जण इच्छुक आहेत. या सात जणांमध्ये रमेश गोरल, प्रभावती चावडी, ॲड. प्रभू यतनट्टी, ॲड. कुमार सरोदे, ॲड. चंद्रहास अणवेकर, सातेरी बेळवटकर आणि रेखा देसाई यांचा समावेश आहे. या सर्वांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे डिपॉझिट पक्षाकडे जमा केले आहे या सर्वांव्यतिरिक्त माजी आमदार रमेश कुडची हे देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची ही यादी उमेदवारी जाहीर होईपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रभावती चावडी या विणकर समाजातील असून गेल्या 8 वर्षापासून काँग्रेस पक्षात असणाऱ्या प्रभावती या पक्षाच्या ओबीसी विंग राज्य उपाध्यक्षा आहेत. महिला विभागाच्या सरचिटणीस म्हणून काम पाहिलेल्या प्रभावती चावडी या पक्षाच्या बागलकोट जिल्हा समन्वयक देखील होत्या.
आपल्या प्रभाताई फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असल्यामुळे निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्या प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी रमेश गोरल हे देखील प्रबळ दावेदार आहेत. माजी जि. पं. सदस्य असलेल्या गोरल यांना दक्षिण मतदारसंघातील मराठी भाषिक आणि मराठा समाजाचे वर्चस्व असलेल्या गावांचा जबरदस्त पाठिंबा आहे. तिकिटाच्या शर्यतीतील आणखी एक आघाडीचे नांव म्हणजे ॲड. प्रभू यतनट्टी हे आहे. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष असणाऱ्या ॲड. यतनट्टी यांचे वकील समुदायामध्ये चांगला नावलौकिक असून त्यांना लिंगायत समाजाचा पाठिंबा आहे.
माजी आमदार रमेश कुडची यांनी देखील या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली आहे. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थक असलेले पूर्वाश्रमीचे समितीचे एस एम बेळवटकर हे देखील दक्षिण मधून इच्छुक आहेत हेब्बाळकर यांच्या पाठिंब्यावर त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.या पद्धतीने बहुतांश इच्छुक उमेदवार हे मातब्बर असल्यामुळे या सर्वांमधून निवडणूक जिंकून देणारा उमेदवार निवडण्याचे कठीण आव्हान सध्या काँग्रेस हाय कमांड समोर आहे.