बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात होर्डिंग्ज हटाओ मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान पक्षपातीपणाने कारवाई करण्यात आल्याचा आरोप पुढे आला. दरम्यान शहरात काही ठिकाणी यावरुन वादही झाला. मात्र आता या मोहिमेत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हाच नोंदविला जात आहे.
महापालिकेच्या तक्रारीवरून टिळकवाडी पोलिस ठाण्यात एका हॉटेल व एका दूध कंपनीच्या विरोधात तर मार्केट पोलिस ठाण्यात ऑटोनगर येथील एका शिक्षण संस्थेविरोधात शहरात विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याबद्दल थेट पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आणखी काही जणांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु आहे.
विनापरवाना होर्डिंग्ज प्रकरण महापालिकेने गांभिर्याने घेतले असून सार्वजनिक जागेत किंवा मिळकतींवर विनापरवाना होर्डिंग्ज लावल्यास विधानसभा निवडणूक काळात ही कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, पण शहरात लावण्यात आलेल्या राजकीय होर्डिग्जविरोधात महापालिका कोणते पाऊल उचलणार याबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारे समारंभ, सभा, राष्ट्रीय नेत्यांचे दौरे, मेळावे यासाठी भव्य स्वागतकमानी उभारून आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांनी शहराचे सौंदर्य झाकोळले आहे. मात्र यावर महापालिकेने कोणती कारवाई करताना दिसून आले नाही. शहरात गेल्या महिनाभरात अनेक राजकीय कार्यक्रम झाले. त्यावेळी शहरभर अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यातील काही होर्डिंग्ज अद्यापही काढण्यात आलेले नाहीत.
टिळकवाडीतील युनियन बँकेच्या एटीएमजवळील सार्वजनिक जागेत एका हॉटेल व्यावसायिकाने होर्डिंग लावून आपली जाहिरात केली होती, पण त्या हॉटेलमालकाने होर्डिंग लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे कारण देत टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. महसूल निरीक्षक अमित लकार यांनी २१ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकवाडी पोलिसांनी संबंधित हॉटेल मालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. तर मराठा मंदिरजवळील पदपथावरील विजेच्या खांबावर एका दूध कंपनीने होर्डिंग लावले होते.
त्याविरोधात अमित यलकार यांनीच टिळकवाडी पोलीस ठाण्यात २१ मार्च रोजी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ऑटोनगर येथील एका इंग्रजी माध्यम शाळेने जुन्या धारवाड रोडवरील एका वीजखांबावर होर्डिंग लावले होते. त्या शाळेविरोधात महसूल निरीक्षक संजीव पाटील यांनी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.