Tuesday, December 24, 2024

/

मालमत्ता नोंदणी रेकॉर्ड घरबसल्या मिळवता येणार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मालमत्तेची नोंदणी आता सात ते दहा मिनिटांत पूर्ण केली जाईल, तसेच नोंदणीनंतर कागदपत्रे आणि स्वाक्षरी केलेले दस्ताऐवजही मालकाच्या डीजी लॉकरमध्ये जातील. आणि ते रेकॉर्ड घरी बसून मिळवता येतील, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.

बेंगळुरू येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल विभागात कावेरी सॉफ्टवेअर २.० प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, आता सर्व कागदपत्रे उपनिबंधक कार्यालयातच उपलब्ध होणार आहेत. याचप्रमाणे खाते, पाहणी, सर्व्हे नंबर आदी सर्व कागदपत्रे कार्यालयात ठेवली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

सदर सॉफ्टवेअर नाविन्यपूर्ण आणि नागरिकांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे एजंटांचा त्रास कमी होईल. तीन महिन्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यात हे सॉफ्टवेअर सुरू होईल. मालमत्ता, विवाह यासह महसूल विभागाच्या सर्व प्रकारच्या नोंदणी ऑनलाईन होणार आहेत. नोंदणीसंदर्भात शिक्षणतज्ज्ञांच्याही अनेक तक्रारी होत्या. त्या तक्रारी आम्ही सोडवल्या आहेत. नोंदणी करण्यापूर्वी घरी बसून डीड उपनिबंधकमध्ये कार्यालयात पाठवा, काही चूक असल्यास उपनिबंधक अधिकारी त्या दुरुस्त करतील. त्यानंतर सर्वकाही योग्य असल्यास, ते तुम्हाला निश्चित रक्कम भरण्याची सूचना देतील, चेहरा, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा नोंदवून घेतील. त्यानंतर ईसी आणि प्रमाणपत्र ऑनलाइन मिळू शकते, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली.

कावेरी सॉफ्टवेअर २.० क्रांतिकारक बदल घडवून आणत आहे. बेळगाव दक्षिण, चिंचोळीत पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाले आहेत. डीडी आणि चलनमध्ये पूर्वी घोटाळा होता. कुणाच्या तरी नाव डीडीने जायचा. आता त्याच्या बँक खात्यातून थेट विभागाच्या खात्यात हस्तांतरण केले जाईल, सर्व्हरची कोणतीही समस्या यापुढे नसेल, असेही महसूल मंत्री म्हणाले.

उपनिबंधक कार्यालय यापुढे पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे काम करेल. तेथे लिफ्ट, अपंगांसाठीच्या रॅम्पची सोय करण्याच्या सूचना केल्या आहेत. विविध कार्यालयांमध्ये हे काम सुरू करण्यात येणार आहे. महसूलाबाबत आम्हाला १७ हजार कोटीचे टार्गेट दिले होते. त्यापेक्षा जास्त आम्ही केले आहे. महसूल भरण्यासाठी आम्ही सूट दिली. मुद्रांक शुल्कातही सूट दिली, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.