Saturday, December 21, 2024

/

महाराजांची उंची गाठू पाहणारे हे खुजे कोण?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भ्रष्टाचार आणि लाचारीने माखलेल्या राजकीय वातावरणात सध्या संपूर्ण देशातील जनता वावरत आहे. अशातच प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून हीन पातळीवर जाणाऱ्या राजकारण्यांचेही अलीकडे पेव फुटले आहे. या राजकारणात राजकीय नेतेमंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही. याचीच प्रचिती सध्या बेळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. मात्र या साऱ्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहेच शिवाय मराठी माणसाच्या भावनाही दुखावल्या जात आहेत.

बेळगावमध्ये गेल्या १५ दिवसांपासून येळ्ळूर येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेवरून सीमाभागातील राजकारण्यांमध्ये मोठे घमासान सुरु आहे. एकीकडे भाजपचे नेते सरकारी निधीच्या नावावर मूर्तीवर आपला हक्क सांगत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या मूर्ती प्रतिष्ठापनेत आपला सहभाग प्रमुख असल्याचे सांगत आहेत. राजहंसगडावर स्थापन करण्यात आलेल्या शिवमूर्तीवरून सीमाभागात श्रेयवादाचे गलिच्छ राजकारण सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर राजकारण्यांना अचानक वाटू लागलाय हि चांगलीच बाब आहे! मात्र इतक्या वर्षानंतर त्यांना छत्रपती शिवरायांची आठवण अशापद्धतीने व्हावी हि बाब निंदनीय आहे.

कर्नाटकात आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरून अनेक वादग्रस्त घटना घडल्या. अनेक ठिकाणी शिवमूर्तीची विटंबना झाली. मात्र यावेळी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य मराठी माणसानेच आणि सच्चा शिवभक्तानेच अशा घटनांचा निषेध नोंदविला. यावेळी कर्नाटकी प्रशासनाने विरोध करणाऱ्या आणि निषेध नोंदविणाऱ्या शिवभक्तांवरच कारवाईचा बडगा उगारला. मात्र यादरम्यान सीमाभागातील राजकारण्यांनी चकार शब्द उच्चारला नाही. जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशी मराठी जनतेची आठवण या राजकारण्यांना होते. आणि राजकारण्यांकडून भावनिक खेळ खेळत दाखविल्या जाणाऱ्या संवेदनशील सहानुभूतीला आणि अचानक उफाळून आलेल्या मराठी प्रेमाला मराठी जनता भुलते आणि याचे परिणाम निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिसून येतात. आणि त्यानंतर पुढची पाच वर्षे पुन्हा कर्नाटकी प्रशासनाचा वरवंटा फिरवला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदू बांधवांचे आराध्य दैवत आहेत. बेळगावमधील प्रत्येक माणूस सकाळी उठल्यानंतर बेळगावच्या मानबिंदूंपैकी एक असलेल्या राजहंसगडाकडे पाहतो आणि मनाशी विचार पक्का करून घराबाहेर पडतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एकमेवाद्वितीय आहे. त्यांचे आचार, विचार, राज्य करण्याची पद्धत, प्रजेबाबत असलेली निस्पृह काळजी आणि विशेषतः अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र आणू उभं केलेलं स्वराज्य! अशा जाणत्या राजाच्या गडासंदर्भात आणि अशा राजासंदर्भात श्रेयवादासाठी इतक्या नीच पातळीवर राजकारण करणारी हि कुणाची अवलाद आहे? असा संतप्त सवाल प्रत्येक राजकारण्यांना मराठी जनता विचारात आहे.

देश स्वातंत्र्या नंतर 75 वर्षे राजहंसगड दुर्लक्षित राहिला ही खेदाची बाब आहे तसेच त्याच्या सुशोभिकरणाला असे गालबोट लागणे हे संतापजनक आहे. ज्या राजाने आपल्या अफाट कर्तुत्वाने साऱ्या देशभर स्वराज्याचा पाया उभारला पण स्वतःच्या पराक्रमाचे शौर्याचे श्रेय स्वतः कधीच घेतले नाही व जनतेला आणि रयतेला मोठे करण्यात धन्यता मानली.त्या छ्त्रपती शिवरायांचे अनावरण कोणत्याही राजकारणी माणसाने करावे आणि त्याचे श्रेय लाटावे हेच मुळात हास्यास्पद आणि न पटणारे आहे.

300 वर्षा पेक्षा वर्षे डौलाने उभे असलेल्या राजहंस गडाला राजकारणाचे केंद्र करून मराठीचा अपमान करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा निषेध सामान्य जनता करत आहे.

येत्या काही दिवसातच कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा पुळका राजकारण्यांना आला आहे. मराठी मतांवर घुबडाची नजर ठेवून संधीसाधू राजकारण करणाऱ्या खुज्या राजकारण्यांकडून महाराजांची उंची गाठण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सीमाभागात हास्यास्पद ठरत आहे. तेव्हा, समस्त सीमाभागातील मराठी बांधवांनी, सच्च्या शिवभक्तांनी आपली मराठी अस्मिता, संस्कृती आणि छत्रपतींवरील आस्था मनाशी बाळगून आपला स्वाभिमान कुठेच गहाण पडणार नाही आणि अशा विचारहीन राजकारण्यांकडून छत्रपती आणि मराठी संस्कृतीचा अवमान होणार नाही याची दक्षता घेणे यातच सीमाभागाचे हीत आहे, हि बाब गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.