बेळगाव लाईव्ह :परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नसल्याने२४ मार्चपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १ मार्च रोजी संप पुकारला होता.
या संपात परिवहन महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाले नव्हते. त्यामुळे २४ मार्चपासून परिवहन महामंडळाने पुन्हा संपाची हाक दिली असून २४ तारखेपासून पुन्हा परिवहन सेवा कोलमडणार आहे.
राज्यात चार विभागांत परिवहन महामंडळाचे कर्मचारी कार्यरत आहेत. तीन वर्षांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालेली नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याला ८ तासांची ड्यूटी द्यावी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी. सरकारी सेवेत कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी यापूर्वी दोनवेळा परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले होते.
आगारातच ठिय्या मांडून आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता. मात्र, काही मोजक्याच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले होते.
मात्र अजून कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे २४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा परिवहन कर्मचाऱ्यांनी दिला आहे.