मुचंडी गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या 4 एकर शेत जमीनीचा वाद पुन्हा चिघळला असून काल रात्री पासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तथापि आज सोमवारी गावांमध्ये कट्टबंध वार पाळून गावकऱ्यांनी एकमताने बोळशेट्टी कुटुंबियांकडील गावातील कुस्ती आखाडा आणि श्री सिद्धेश्वर देवस्थानची पुजारकी काढून घेतली. तसेच त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुचंडी (ता. जि. बेळगाव) गावातील बोळशट्टी कुटुंबियांकडे गेली 40 वर्षे श्री सिद्धेश्वर देवस्थानची शेत जमीन होती. गावकऱ्यांच्या पुढाकाराने ती जमीन पुन्हा देवस्थानच्या ताब्यात आली होती. त्या शेत जमीनीचा समस्त गावकऱ्यांच्यावतीने लिलिव करण्यात आला होता.
बोळशट्टी कुटुंबातील चन्नाप्पा बोळशेट्टी व श्रीनाथ बोळशेट्टी यांनी सुद्धा लिलिवात सहभागी होऊन शेत जमीन घेतली होती. मात्र आता ती शेत जमीन देवस्थानला परत देण्यास बोळशेट्टी कुटुंबीयांकडून विरोध होत आहे. त्यामुळे काल रात्री पासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गावात तणाव निर्माण झाल्यामुळे आज सोमवारी गावांमध्ये कट्टबंध वार पाळून गावकऱ्यांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली. मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित असलेल्या या बैठकीत चर्चेअंती एकमताने गावातील कुस्ती आखाडा गावकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला.
त्याचप्रमाणे बोळशेट्टी कुटुंबियांकडे असलेली श्री सिद्धेश्वर देवस्थानची पुजारकी काढून घेण्यात आली. तसेच त्यांच्यावर ग्रामस्थांकडून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.आता गुढी पाडव्यानिमित्त येत्या रविवारी देवस्थानाच्या उर्वरित शेत जमिनीचाही लिलाव करण्याचा निर्णय आजच्या गावकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.