महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक बनू इच्छिणाऱ्या मात्र मुलाखतीस आडकाठी केली जात असलेल्या बेळगाव सीमा भागातील एका तरुणाला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठविला.
निपाणी (जि. बेळगाव) येथील सनमकुमार पंडित माने या तरुणाला महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) व्हायचे आहे. मात्र आवश्यक सर्व परीक्षा चांचण्या दिल्यानंतर जाती प्रमाण पत्राचे कारण पुढे करून त्याला मुलाखतीला बसण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माहितीचा मुद्दा मांडून आज महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठविला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सनतकुमार पंडित माने याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
निपाणी -बेळगावचे सनमकुमार पंडित माने हे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत. ज्यांनी महाराष्ट्रातील पीएसआय पदासाठी एमपीएससी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चांचणी परीक्षा देखील दिली आहे. गेल्या 9 मार्च 2023 रोजी त्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. मात्र महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला असल्याशिवाय तुम्हाला मुलाखत देता येणार नाही असे असे सांगून त्यांना मुलाखतीस बसण्यास मज्जाव करण्यात आला. दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी यासंदर्भात महाराष्ट्रातील प्रमाणपत्र नसले तरी सीमाभागातील युवकांना नोकरीत सामावून घेतले जावे असे सांगितले होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात आपण सीमावासियांच्या पाठीशी आहोत असे सांगत असतात.
स्वतः शिवसैनिक असताना तेथे गेले होते. तेंव्हा सर्व परीक्षा दिलेल्या असतानाही मुलाखतीस परवानगी नाकारण्यात आलेल्या सनमकुमार पंडित माने यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती वजा मागणी आमदार रोहित पवार यांनी विधानसभा सभागृहात केली.