बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावर रविवारी (दि. १९) आयोजिण्यात आलेला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक सोहळा हजारोंच्या उपस्थितीत दिमाखात साजरा झाला. रायगडावरील के. एन. पाटील गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक विधीचे पौरोहित्य करण्यात आले. समिती नेते मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, एम. जी. पाटील, विकास कलघटगी, सुधीर चव्हाण आर. आय. पाटील शिवाजी सुंठकर आदींसह अनेक समिती नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत विधी पार पडल्या.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांनी मराठी जनतेच्या भावनेशी खेळ करत राजहंसगडावर केलेला कार्यक्रम, शिवरायांचा आणि शिवभक्तांचा केलेला अवमान याला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी आयोजित केलेल्या या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने आणि शिवरायांच्या साक्षीने आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीलाच निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली.
राष्ट्रीय पक्षांमध्ये देणगीदाखल नेत्यांना अनेक पद्धतीने पक्षश्रेष्ठींकडे निधी जमा करावा लागतो. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती हि एक अशी संघटना आहे ज्या संघटनेच्या बळकटीकरणासाठी लोकवर्गणीतून निधी स्वयंस्फूर्तीने जमा होतो. यासाठी कोणाला आवाहन करण्याची किंवा कुणाकडे मदत जमा करण्याची मागणी करण्याची गरज नाही. गेल्या कित्येक निवडणुकीत लोकवर्गणीतून निवडणुका लढवून त्या जिंकून आणण्याची ताकद समितीने ठेवली आहे.
केवळ निवडणुकाच नव्हे तर अनेक आंदोलने समितीने स्वतःच्या बळावर आणि लोकवर्गणीतून उभ्या होणाऱ्या निधीतून लढली. याचेच ज्वलंत उदाहरण देखील आज राजहंसगडावर पाहायला मिळाले.
राजहंगडाच्या पायथ्यापासून महिलावर्गाने डोक्यावर मंगल कलश घेऊन, पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. भजनी मंडळाचा ठेका, हलगीचा ताल, टाळ, मृदूंगाच्या तालावर अभंग, भजन, हाती घेतलेले भगवे झेंडे या साऱ्या वातावरणामुळे राजहंसगडावर शिवमय वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. शोभायात्रेत अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. ढोल ताशा, झांझ पथक, पोवाडे लक्षवेधी ठरले. राजहंसगडावर महिलावर्गाचीही मोठ्या संख्येने हजेरी होती. विधिवत दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक आटोपल्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कोणताही कार्यक्रम ठरवायचा तर राष्ट्रीय पक्षांना गर्दी जमविण्यासाठी कसरत करावी लागते. भेटवस्तूंसह अनेक गोष्टींचे आमिष दाखवावे लागते. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी, आंदोलनासाठी, मेळाव्यासाठी हिरीरीने कार्यकर्त्यांची गर्दी होते. या मेळाव्यात, कार्यक्रमात कोणत्याही गोष्टींचे प्रलोभन देण्यात येत नाही. पण केवळ मराठी अस्मितेसाठी हजारोंच्या संख्येने मराठी ताकद आजवर दिसून आली आहे.आणि याचा प्रत्यय आज देखील राजहंसगडावर आला.
सकाळी ९ पासून सुरु झालेल्या राजहंसगडावरील कार्यक्रमास कार्यकर्त्यांची रीघ सतत सुरु होती. दुपारीदेखील अनेक कार्यकर्ते राजहंसगडाकडे येताना दिसत होते. या कार्यक्रमास केवळ कार्यकर्तेच नव्हे तर कार्यकर्त्यांच्या संपूर्ण कुटुंबानेही हजेरी लावली होती. गडावर पोवाडे, लाठीमेळा, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती. गडाच्या चारी बाजूंनी फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. एकंदर सोहळा पाहून पुन्हा एकदा मराठी जनतेची ताकद संपूर्ण बेळगावला आणि बेळगावमधील राज्यकर्त्यांना दिसून आली आहे. हि ताकद अशीच विधानसभेच्या निवडणुकीत देखील दिसून यावी, आणि हीच ताकद समितीच्या पथ्यावर पडावी, हि शिवरायांचरणी प्रार्थना!