राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून नियमानुसार या सोहळ्याची पूर्वकल्पना प्रशासनाला देण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असली तरी या सोहळ्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत निवासी जिल्हाधिकारी श्रीमती हेमलता यांची भेट घेऊन येत्या 19 मार्च रोजी होणाऱ्या शिवरायांच्या दुग्धाभिषेक सोहळ्याची माहिती देणारे निवेदन त्यांना सादर केले. त्यानंतर या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनाही त्या निवेदनाची प्रत सादर केली.
यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी पोलीस आयुक्तांना दुग्धाभिषेक सोहळ्या बद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच भगवा ध्वज फडकविणे हा कांही गुन्हा नाही, परंतु कांही पोलिस अधिकारी भगवा फडकविण्यास मज्जाव करत असल्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्तांच्या कानावर घातली. निवेदनाचा स्वीकार करून पोलीस आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
समितीच्या शिष्टमंडळाने आज बेळगावचे तहसीलदार, महांतेशनगर येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अधिकारी आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नियोजित दुग्धाभिषेक सोहळ्याची माहिती देणारे निवेदन सादर केले.
म. ए. समितीच्या शिष्टमंडळात समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, बाळू जोशी, गौरव जोशी, नवीन हंचीनमणी, प्रीतम पाटील, श्याम गोंडाडकर आदींचा समावेश होता.