Thursday, December 26, 2024

/

कोंडुसकर यांनी मिटविली मंगाईनगरवासीयांची तहान

 belgaum

शहरातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मंगाईनगर वडगाव येथील रहिवाशांचे तर पाण्याविना अतिशय हाल सुरू होते. याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते रमाकांत कोंडुसकर यांनी आजपासून या भागासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याद्वारे मंगाईनगरवासीयांना दिलासा दिला.

मंगाईनगर पहिला क्रॉस वडगाव परिसरात गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नाही. या ठिकाणी तलाव निर्मितीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे विहिरी आटल्या आहेत. तसेच बोअरवेलला देखील पाणी येत नाही. त्यामुळे पाण्याविना येथील रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू होते. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी सकाळी मंगाईनगरला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी तेथील नागरिकांनी विशेष करून महिला गृहिणीवर्गाने कोंडुसकर यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. घरपट्टी, पाणीपट्टी सर्व प्रकारचे कर महापालिकेकडे भरून देखील आम्हाला पिण्याचे पाणी का मिळत नाही? जवळच असलेल्या आदर्शनगरमध्ये मुबलक पाणीपुरवठा केला जातो, मग आमच्यावरच अन्याय का? असा सवाल करून आम्हाला पंधरा दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येते. मात्र ते पिण्यासाठीही पुरत नाही, अशी तक्रार गृहिणींनी केली.

या ठिकाणी जी तलावाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळेच या भागातील सर्व विहिरींचे पाणी तलावाच्या खड्ड्यात जाऊन वाया जात आहे. परिणामी येथील विहिरींचे आणि बोअरवेलचे पाणी आटले आहे असा आरोप महिला वर्गाने केला. तसेच तलावासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामुळे आपल्या मुलाबाळांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रारही त्यांनी केली.

सर्वांच्या व्यथा, तक्रारी आपुलकीने ऐकून घेतल्यानंतर रमाकांत कोंडुसकर यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे मंगाईनगरकडे साफ दुर्लक्ष झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधीं अथवा नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर आपल्याला मतं घातलेल्या आणि न घातलेल्या अशा सर्वांनाच समानतेची वागणूक दिली पाहिजे. मात्र मंगाईनगरच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. गेली 25 वर्षे या ठिकाणच्या विहिरी कधीही आटल्या नव्हत्या. त्या आता या ठिकाणी विकासाच्या नावाखाली खोदण्यात येत असलेल्या तलावाच्या खड्ड्यामुळे आटू लागल्या आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शिवाय त्या खड्ड्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करून या पद्धतीने विकासाच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी कमिशन खाण्याचा प्रकार होत राहिला. समाजाचे नुकसान करण्याचा प्रकार होत असेल तर येत्या काळात मंगाईनगर मधील रणरागिणी माता-भगिनीच संबंधितांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाहीत, असे कोंडुसकर म्हणालेKonduskar

मंगाईनगरला पिण्याचे पाणी का सोडले जात नाही? या ठिकाणी तलावासाठी खड्डा खणण्या आधी येथील रहिवाशांची मान्यता घेतली होती का? हे माझे महापालिका आयुक्तांना प्रश्न आहेत. महापालिका सार्वजनिक बांधकाम खाते लोकप्रतिनिधी ज्यांनी कोणी हा खड्डा खणला असेल त्यांनी या खड्ड्यामुळे येथील जनतेला किती त्रास होतो आहे हे लक्षात घेतले पाहिजे असे सांगून कोंडुसकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कोणाच्या पाठबळाविना, सरकारच्या मदतीशिवाय स्वयंप्रेरणेतून मी या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची ही सेवा करत आहे.

ही सेवा भविष्यात आणखी मोठी करण्याची संधी सर्वांनी मला आशीर्वाद स्वरूपात द्यावी, असे रमाकांत कोंडुसकर शेवटी म्हणाले. कोंडुसकर यांनी आजपासून टँकरच्या माध्यमातून मंगाईनगर पहिला क्रॉस वडगाव परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय केल्यामुळे सर्वजण त्यांना धन्यवाद देत आहेत. या ठिकाणचा वयस्क महिलावर्ग तर तुमच्या रूपाने देव आमच्या मदतीला धावून आला असे म्हणत कृतज्ञतेने रमाकांत कोंडुसकर यांचे पाय धरताना दिसत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.