Saturday, December 21, 2024

/

भाजप उमेदवारीसाठी उत्तरमधून जोरदार रस्सीखेच

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. इच्छुकांनी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक कामे राबविली आहेत. निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी जोरदार कंबरही कसली. मात्र पाहता पाहता निवडणुकीतील इच्छुकांची गर्दी इतकी झाली कि आता पक्षश्रेष्ठींनाही उमेदवार निवडण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. अशीच काहीशी परिस्थिती भाजपमध्ये दिसून येत असून उत्तर मतदार संघात विद्यमान आमदार अनिल बेनके यांच्यासह मोठमोठ्या नेत्यांनीही उमेदवारीसाठी रांगा लावल्या आहेत.

बेळगाव उत्तर मतदार संघात मराठा आणि लिंगायत समाजातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच अनुषंगाने मराठा समाजातील नेते आणि लिंगायत समाजातील नेते उमेदवारीसाठी रस्सीखेच करत आहेत. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विद्यमान आमदारांनाच आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी देऊन संधी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र यामुळे लिंगायत समाजावर अन्याय होईल, या कारणास्तव लिंगायत समुदायाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी लिंगायत स्वामी तसेच लिंगायत संघटनांच्यावतीने होत आहे.

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार अनिल बेनके यांचा बहुमताने विजय झाला. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांनी मतदार संघात विकासकामांचा सपाटा लावला. कोरोना काळात विकासकाम होणे शक्य नव्हते, मात्र या काळात आमदारांनी आहार किट, मास्क, ऑक्सिजन पुरवठा करून मतदार संघातील जनतेला मदत केली. आपल्या कार्यकाळात आमदार अनिल बेनके यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्मार्ट रस्ते, हायटेक पद्धतीचे मध्यवर्ती बसस्थानक, महांतेश नगर येथे अनुभव मंटप, किल्ला तलावाचे सुशोभीकरण, धर्मवीर संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण यासह सरकारी अनुदानातून उत्तर मतदार संघाचा विकास करण्याकडे लक्ष पुरविले.अलीकडेच सरदार्स मैदानावर भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन यासह अनेक उपक्रम राबवून जनतेच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

आमदार अनिल बेनके हे मराठा समाजाशी निगडित असले तरी मराठा समाजातीलच आणखी एका नेत्याने उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केला आहे. बेळगाव शहर प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय बेळगावकर हे देखील उत्तर मतदार संघातील प्रभावी नेतृत्व ठरत असून त्यांनी उत्तर मतदार संघात उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तर लिंगायत समाजाचे बेळगाव शहर विभागाचे प्रधान सचिव मुरुगेन्द्रगौडा पाटील यांनीही महिलांसाठी विविध उपक्रम राबवत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचा इशारा दिला. विजया हॉस्पिलचे प्रमुख डॉ. रवी पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी मागील लोकसभा पोटनिवडणुकीपासूनच राजकारणात सक्रिय होण्याची तयारी सुरु केली होती. अलीकडेच त्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या जीवनावर आधारित नाटकाचेही आयोजन केले होते. याचप्रमाणे अनेकठिकाणी त्यांनी विविध उपक्रम देखील राबविले आहेत. बुडाचे माजी अध्यक्ष घोळाप्पा होसमनी हेदेखील विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीत असून त्यांनी नवी वसाहत निर्मिती करण्यासाठी मेहनत घेतली आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे ते निकटवर्तीयादेखील आहेत.Mes politics vidhansabha

बेळगाव विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी विद्यमान आमदार अनिल बेनके यांच्यासह अन्य चार मान्यवर रांगेत उभे आहेत. बुडाचे विद्यमान अध्यक्ष संजय बेळगावकर, विजया ऑर्थोचे डॉ. रवी पाटील, लिंगायत समाज शहर विभागाचे प्रधान सचिव मुरुगेन्द्रगौडा पाटील आणि बुडाचे माजी अध्यक्ष घोळाप्पा होसमनी यांचीही जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

उत्तर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदारांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार अशी दाट शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र अलीकडेच भाजपने विद्यमान आमदार-खासदारांना उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय पाहता हे चित्र पालटेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीही सक्रियपणे निवडणुकीत सहभागी होणार असून समितीमधूनही अमित देसाई, , ऍड. अमर येळ्ळूरकर,शिवाजी मंडोळकर यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे हि निवडणूक राष्ट्रीय पक्षांना तगडी टक्कर देणारी ठरणार, हे निश्चित आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.