बेळगाव लाईव्ह : राज्यातील सर्वाधिक मतदान केंद्र असणारा जिल्हा म्हणून बेळगावचे नाव अग्रक्रमावर असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ४३४ मतदार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी बुधवारी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आगामी निवडणुकीत ३८ लाख ३३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १९ लाख ३६ हजार महिला व १८ लाख ९६ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी २४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तयारी आणि जारी आचारसंहितेबाबत अधिकारी आणि पोलिस विभागाला आवश्यक त्या सूचना बजाविल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सेवा उपलब्ध असणार आहे. त्यांची संख्या ४१ हजार ७२० आहे. यात २५ हजार ५५९ पुरुष आणि १६ हजार १५७ महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्या चार आहे. युवा मतदारांची संख्या ७९ हजार ४९५ आहे. तर ८० पेक्षा अधिक वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख १९ आहे. वयोवृध्द आणि ज्येष्ठांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवरदेखील कडक तपासणी होत असून जिल्ह्यामध्ये ६१ चेकपोस्ट आहेत. त्यापैकी २४ चेकपोस्ट आंतरराज्य सीमेवेर आहेत. त्यापैकी ३ चेकपोस्ट गोवा राज्याच्या सीमेवर आहेत. तर १९ चेकपोस्ट महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहेत. आतापर्यंत चेकपोस्ट भरारी पथकांकडून ३ कोटी ५४ लाख ३२ हजार १८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्वाचित सदस्य, सरकारनियुक्त सदस्यांचे वाहन ताब्यात घेण्याचे आणि बदली प्रक्रिया थांबविण्याचे तसेच जिल्हा, तालुका व सर्व विभाग प्रमुखांच्या रजा रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.