अनगोळ येथे एका घराला आग लागून घरातील साहित्य बेचिराख झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हॉटेलमध्ये काम करणारी एक महिला आपल्या दोन लहान मुलींसोबत राहत असलेल्या अनगोळ येथील एका घराला आज सकाळी अचानक आग लागली. घराला आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून त्या महिलेने आपल्या मुलींसह बाहेर भाव घेत जीव वाचवला.
घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान पाण्याच्या बंबासह वेगाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच पाण्याची फवारणी करून आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत घरातील साहित्य जळून भस्मसात झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा कयास आहे. या दुर्घटनेमुळे आपल्या मुलींसमवेत एकाकी राहणाऱ्या त्या गरीब महिलेवर संकट कोसळले आहे.
आगीची माहिती मिळताच युवा भाजप नेते किरण जाधव आणि म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी त्या जळीतग्रस्त महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी कोंडुसकर यांनी आगीमुळे घराचे जे नुकसान झाले आहे त्याची दुरुस्ती करून देण्याचे, तर किरण जाधव यांनी तिला भांडीकुंडी वगैरे घरगुती साहित्याची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, घराला आग लागल्यामुळे बेघर झालेल्या त्या असहाय्य झालेली ती महिला व तिच्या मुलींना स्थानिक कार्यकर्ते सध्या तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याच्या आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीला लागले आहेत.
घराला आग लागल्याच्या दुर्घटनेची माहिती मिळवून देखील तलाठी आणि तहसीलदारांपैकी कोणीही उशिरापर्यंत पंचनाम्यासाठी आले नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.