बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अंतरिम सवलत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ जाहीर केली. याबाबतचा आदेश तातडीने जारी केला जाईल, असे त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
इतर राज्यांमधील नवीन पेन्शन योजना, आर्थिक परिणाम आणि इतर समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाईल आणि त्यानंतर सविस्तर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला होता. हा संप मिटविण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घोषित केला आहे.
तसेच भारतातील इतर राज्यांमध्ये सुरू झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यासंदर्भात वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचनाही दिल्या आहेत. या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे.