गोवा सरकार आणि राजश्री क्रिएशन राज बिल्डरच्यावतीने गेल्या शनिवारी ‘पोलीस डे’ साजरा करण्यात आला. या सोहळ्याला बेळगावचे उद्योगपती विजय पाटील, म्हैसूर प्रसादचे अनुप जवळकर व माजी महापौर विजय मोरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते हे विशेष होय.
सदर पोलीस डे सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा कला अकादमीचे मंत्री गोविंद गोविंद गावडा यांच्यासह इतर मंत्री आमदार, गोव्यातील नामांकित मंडळी आणि गोव्याचे पोलीस महासंचालक (आयजीपी) उपस्थित होती.
विशेष म्हणजे या सोहळ्यास बेळगावचे उद्योगपती विजय पाटील, म्हैसूर प्रसाद बेळगावचे अनुप जवळकर आणि बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सर्वांच्या हस्ते पोलीस खात्यात निष्ठेने उल्लेखनीय कार्य केलेले पोलीस, होमगार्डपासून जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) पर्यंतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस डेनिमित्त यावेळी गोव्यातील कलाकारांनी लक्षवेधी कार्यक्रम सादर करून वाहव्वा मिळविली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ व ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकार पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होता. सदर सोहळा पारितोषिक विजेत्या पोलिसांसह समस्त पोलीस कर्मचारी, अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आप्तस्वकीय -मित्रमंडळी या सर्वांनाच आनंद देऊन गेला. संदीप निगळे व त्यांची टीम तसेच राजश्री क्रिएशन यांच्या टीमने गोवा पोलीस डे सोहळ्याचे सुरेख आयोजन करून तो यशस्वी केला.
सोहळ्याच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक केले. गोव्याचे मंत्री व शिरोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडा यांनी सुद्धा आयोजक आणि पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. शेवटी संदीप निगडे यांनी सर्वांचे आभार मानले.