केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना काल मंगळवारी जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मंगळूर पोलिसांनी एका युवतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांचे नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटल जवळ जनसंपर्क कार्यालय आहे. सदर कार्यालयात काल मंगळवारी सकाळी दोघा अज्ञातांनी फोन करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास गडकरी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
फोन आला त्यावेळी गडकरी कार्यालयामध्ये नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्वरित घडल्या प्रकाराची माहिती नागपुरातील धंतोली पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ नितीन गडकरी यांच्या सुरक्षा व्यवस्थित वाढ करण्याबरोबरच तपासाची चक्री वेगाने फिरवली. दरम्यान ‘त्या’ अज्ञात फोन प्रकरणी मंगळूर पोलिसांनी एका युवतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री गडकरी यांना अशाच प्रकारे त्यांच्या कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हे धमकीचे फोन गेल्या 14 जानेवारी रोजी बेळगावच्या हिंडलगा कारागृहातील आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारी याच्या नावाने करण्यात आले होते. आताही त्याच नावाने धमकी देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांचे एक पथक तातडीने बेळगावकडे रवाना झाले आहे.