बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे आव्हान असते. बेळगावमधील चार मतदारसंघात केवळ राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत नसून या उमेदवारांना तगडी टक्कर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारही निवडणूक रिंगणात असतात. त्यामुळे या मतदार संघामध्ये उमेदवार निवडताना मोठी कसरत करावी लागते.
दरवेळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उशिरा उमेदवार जाहीर करण्यामध्ये राष्ट्रीय पक्षांमध्ये स्पर्धा रंगलेली असते. मात्र उमेदवारीसाठी राष्ट्रीय पक्षांमध्ये अंतर्गत राजकारणही तितक्याच मोठ्या पद्धतीने रंगलेले असते. सध्या बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरु असून काँग्रेसच्या चार इच्छुकांनी प्रबळ दावेदारी केली आहे. अंजुमन संस्थेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, विद्यमान नगरसेवक अजीम पटवेगार, आणि लि काँग्रेस शहर अध्यक्ष विनय नावलगट्टी, किरण साधुन्नावर हे सहा इच्छुक उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.
राजू सेठ यांनी जनतेसाठी आजवर अनेक कामे केली आहेत. अंजुमन संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवत अनेकांना सहकार्य केले आहे. कोविड काळात देखील जनतेची मोठी मदत केली आहे. माजी आमदार फिरोज सेठ यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांनीही आपल्या कार्यकाळात आणि कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात समाजाभिमुख कार्य केले आहे.
नगरसेवक अजीम पटवेगार यांनीही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे ते दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत न्यू गांधी नगर आझाद नगर सह मुस्लिम युवकांत मानणारा त्यांचा मोठा वर्ग आहे या शिवाय मुस्लिम समाजासाठी अनेक कार्यक्रम ते राबवत असतात.पटवेगार यांना अप्रत्यक्षरीत्या सतीश जारकिहोळी यांचे समर्थन आहे त्यामुळे त्यांचीही दावेदारी तगडी आहे. त्यानंतर लिंगायत समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विनय नावलगट्टी हेदेखील उमेदवारीच्या शर्यतीत असून नावलगट्टी यांना ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थन आहे.
येत्या २-४ दिवसात काँग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत असून उत्तर मतदार संघातून उमेदवारीसाठी सुरु असलेल्या रस्सीखेच मध्ये कुणाचे पारडे जड होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.