बेळगाव लाईव्ह : उचगाव येथील जागृत देवस्थान श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहाला मंगळवारी सुरुवात झाली. मळेकरणी देवीचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महा आरतीने या उत्सवाची सुरुवात झाली.
सोमवारी होळी पौर्णिमेला देवीची पालखी गांधी चौकातील देसाई यांच्या वाड्यातून वाजत गाजत कचेरी गल्ली मार्गे, बस स्थानक व मळेकरणी मार्गावरून देवीच्या आमराईत आणण्यात आली. त्यानंतर पहाटे मळेकरणी देवीची यथासांग पूजा, अभिषेक सह आमराईतील विविध मंदिरातून सर्व पूजा करून ध्वजारोहण तसेच अग्निदेवता प्रज्वलित पुजन करून या महाआरतीला प्रारंभ झाला. यावेळी उचगावसह आसपास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे हा वार्षिकोत्सव ग्रामस्थांच्या सहभागाने साजरा केला जातो. यामुळे मंगळवार हा श्री मळेकरणी देवीचा मानाचा वार आणि वार्षिकोत्सवाचा पहिला दिवस असल्याने हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
श्री मळेकरणी देवी सप्ताह उत्सव कमिटीच्या वतीने उपस्थित भाविकांचे स्वागत करण्यात आले. या उत्सवादरम्यान दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रोज रात्री देवीचा जागर करण्यासाठी भारूड, भजन, महीला भजन व इतर कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले असून, या उत्सवाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन उत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.