बेळगाव शहरातील क्लब रोड येथील न्यूरो स्पेशालिटीज सेंटरचे संचालक तथा सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट अर्थात मज्जातंतू विकार तज्ञ डॉ. जी. एम. वाली यांची मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
कोलकाता येथे गेल्या 16 मार्च रोजी पार पडलेल्या मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडियाच्या परिषदेमध्ये डॉ जी एम वाली यांनी 2023 सालासाठी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली.
सदर परिषदेस जगभरातील जवळपास 700 न्यूरोलॉजिस्ट उपस्थित होते. मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था 2014 मध्ये स्थापन झाली असून ती अमेरिकेमध्ये मुख्यालय असलेल्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर मूव्हमेंट डिसऑर्डर्स या संस्थेची संलग्न आहे.
सदर सोसायटी देशभरातील न्यूरोलॉजिस्ट अर्थात मज्जातंतू विकार तज्ञांनी स्थापन केली असून या संस्थेमार्फत पार्किंसन विकार आणि संबंधित हालचाल विकारांवर प्रगत संशोधन केले जाते.
डॉ. वाली यांचे क्लब रोड बेळगाव येथील न्यूरो स्पेशलिटीज सेंटरचा पार्किंसन विकाराशी संबंधित संशोधनात सक्रिय सहभाग असून त्यांचे त्यासंबंधीचे 40 इंटरनॅशनल पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत.
सध्या डॉ. जी. एम. वाली हे भारतातील पार्किंसन विकार अनुवांशिकेतेचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या गटाचे सक्रिय सदस्य आहेत. या अभ्यासासाठी इंटरनॅशनल मायकल फॉक्स फाउंडेशनकडून निधी पुरवला जातो.