रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी बेळगाव पोलीस हेडकॉटर समोरील रस्त्याच्या दुभाजकाच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या फुल झाडांच्या कुंड्यांमधील झाडे सुकून जात असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी वाहन चालक आणि पर्यावरण प्रेमींमधून होत आहे.
रस्त्याचे सौंदर्य वाढविण्याबरोबरच बेळगावला भेट देणाऱ्या महनीय, अतिमहनीय लोकांवर छाप पाडण्यासाठी बेळगाव पोलीस हेडकॉटर समोरील रस्त्यांच्या दुभाजकाच्या ठिकाणी अलीकडे फुलझाडांच्या मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.
रस्त्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि दुभाजक दर्शवण्यासाठी या कुंड्या ठेवण्यात आल्या असल्या तरी त्या कुंड्यांमधील फुल झाडांची देखभाल, त्यांचे संवर्धन याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. महापालिका अथवा पोलीस प्रशासनाकडून वेळच्यावेळी पाणी घातले जात नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी आपल्या ताज्या टवटवीतपणामुळे रस्त्यावर अल्हाददायक वातावरण करणारी ही फुलझाडे सध्या सुकून गेली आहेत.
पोलीस हेडकॉटर रस्त्याप्रमाणेच टिळकवाडीतील आरपीडी कॉर्नर ते आदर्शनगर रिक्षा स्टॅन्डपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांची देखील हिच दशा झाली आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विशेष करून रस्त्याच्या दुभाजकावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडं आणि फुल झाडांना वेळच्या वेळी पाणी देऊन त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.