Sunday, November 24, 2024

/

निवडणुकीसाठी समितीचे दुकान उघडणाऱ्यांना शेवटचा इशारा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या काही वर्षात समिती नेत्यांच्या स्वार्थाच्या राजकारणामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीची पीछेहाट झाली आहे. कोणतीही निवडणूक प्रक्रिया न राबवता, ऐनवेळी निवडणुकीत मराठी भाषिकात दुफळी निर्माण करण्यासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करणाऱ्या आणि केवळ उमेदवारीसाठी आणि निवडणुकीसाठी समितीचे दुकान उघडणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना मराठी जनतेने इशारा दिला आहे. मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार अशा संकुचित वृत्तीच्या नेत्यांना नसून आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी समाजात आणि महाराष्ट्र एकीकरण समितीत दुही माजविण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीची गेली कित्येक वर्षे पीछेहाट होण्यास अनेक कारणे आहेत. ऐनवेळी दोन उमेदवार जाहीर होणे, मूळ समितीव्यतिरिक्त इतर समित्या कार्यरत होणे ही त्यातील प्रमुख कारण आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही दोन समित्या कार्यरत झाल्या आणि मतांचे विभाजन झाले. त्याचबरोबर समितीतील सावळा गोंधळ पाहून मराठी भाषिकांनी समितीकडे पाठ फिरविली. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आधी एक आणि नंतर दुसरी यादी जाहीर झाली आणि यादरम्यानही सावळा गोंधळ निर्माण होऊन मतदार द्विधा मनस्थितीत गेला आणि मताचे विभाजन झाले. समितीचे पानिपतमध्ये पर्यवसान झाले. अशापद्धतीने अनेकवेळा समितीच्या कार्यात सुसूत्रता न राहिल्याने याचा परिणाम समितीचा उमेदवार पराभूत होण्यात होत आहे.

मराठी भाषा वाचविणे, सीमालढा, मराठी माणसाचे हीत जोपासणे यासारख्या निश्चित ध्येयाने प्रेरित होऊन समिती कार्यरत आहे. मात्र, काहींना वैयक्तिक स्वार्थ, पद, सत्ता, आर्थिक लाभ मिळविण्याची स्वप्ने पडतात. काहींना आपले वर्चस्व आणि समाजावर हक्क सिद्ध करायची संधी हवी असते. यामुळे समितीचा मूळ उद्देश बाजूला पडतो. निवडणुकीच्या कालखंडात अनेक स्वयंघोषित नेते तयार होतात. अनेक नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची संख्या वाढू लागते. मात्र समितीत आलेला नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा हा फुगवटा निवडणुकीनंतर दिसत नाही. नेत्यांच्या ध्येयधोरणाच्या बाबतीत समसमान भावना नसल्याने नेत्यांचीही वाटणी होते. अशापद्धतीची कार्यप्रणाली असल्याने त्या कार्यप्रणालीला कंटाळून अनेकांनी राष्ट्रीय पक्षाचा मार्ग स्वीकारला आहे, अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या हेकेखोरपणाला कंटाळून आपण समितीतून बाहेर पडल्याचे कबूल केले आहे. नेत्यांनी ना जनतेला विश्वासात घेतले ना जनतेच्या भावना समजून घेतल्या. परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता कमकुवत निर्णय घेतले. या सर्व पार्श्वभूमीवर विचार करता समितीला चांगले दिवस यायचे असतील तर निश्चित रूपानं एक ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.Mes politics vidhansabha

अलीकडे समितीमध्ये धुरंदर कार्यकर्त्यांचा समावेश होत आहे. मात्र या कार्यकर्त्यांवरही उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. विरोधी विचारसरणीच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये कोणत्याही गोष्टीचा मुलाहिजा न ठेवता कार्यकर्त्यांना सामावून पक्ष बळकटीकरणाकडे लक्ष दिले जाते. मात्र समितीबाबत नव्याने प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होते, यावरून समितीचे मन कोते झाले आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

मराठी माणसाचा परीघ वाढवायचा असेल तर प्रत्येक मराठी भाषिकाला आपल्या संघटनेत आणि संघटनेच्या कार्यप्रणालीत सामावून घेण्याची गरज आहे. एकवेळ बिदर, भालकी, औराद, संतपूर ते कारवारपर्यंत व्याप्ती पसरलेली समितीला आता केवळ बेळगावमधील ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघावर समाधान मानावे लागत आहे,याहून दुर्दैवी बाब नाही. शिवाय बेळगावमधील या चार मतदार संघामध्ये मर्यादित असलेल्या ठिकाणीही छातीठोकपणे समितीचेच वर्चस्व प्रस्थापित होईल, हे सांगता येत नाही. समितीच्या बळकटीकरणासाठी आणि पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हटवादीपणा दूर सारणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत समितीला धुरंधर नेत्यांची, विचारवंतांची गरज आहे. समितीचे कार्यक्षेत्र वाढवून विविध क्षेत्रातील लोकांना समितीत सामावून घेतले पाहिजे. महिलांचा सहभाग वाढवून महिला आघाडीचे बळ वाढविणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास समितीला पुन्हा सुगीचे दिवस येतील यात तिळमात्र शंका नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.