बेळगाव लाईव्ह : १७ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महापौर, उपमहापौर निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. महापौर निवडणूक होऊन महिना पूर्ण झाला पण अद्याप स्थायी समिती सदस्यांची निवडणूक झालेली नाही. पण सध्याच्या सभागृहात स्थायी समितीची रचनाच करण्यात आलेली नाही.
लोकनियुक्त सभागृहात महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मांडत असतात. त्यामुळे महापौर शोभा सोमणाचे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष बैठकीच्या आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण बैठक सोमवारी दि. १३ रोजी मनपा सभागृहात होणार आहे. या बैठकीत २०२३-२४ वर्षातील अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी काळातला अर्थसंकल्प प्रशासन विभागाकडून मांडण्यात येणार आहे. ६ मार्च रोजी महापालिकेत नगरसेवकांची अर्थसंकल्पाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवकांकडून अर्थसंकल्पाबाबत सल्ले मागवण्यात आले होते. त्यानुसार आता सोमवारी अर्थसंकल्पीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा अर्थसंकल्प महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा असेल, असे सांगण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात कोणतेही करवाढ करण्यात येऊ नये, अशा सूचना दोन्ही आमदारांनी केल्या होत्या. त्या सूचनांचे कितपत पालन होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या बैठकीत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी नगरसेवकांना कोणत्याही बैठकीची आठ दिवस आधीच नोटीस पाठवण्यात यावी, केवळ व्हॉट्सअप करून किंवा फोन करून नगरसेवकांना माहिती देण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या होत्या.
त्यानुसार महापालिका प्रशासन विभागाने 6 मार्च रोजी अर्थसंकल्पाच्या बैठकीबाबत लेखी नोटीस सर्व नगरसेवकांना पाठवली आहे.