कॅन्टोन्मेंट हद्दीत 4 कि. मी. अंतराची जलवाहिनी घालण्यासाठी वार्षिक तब्बल 53 लाख 85 हजार रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गेल्या 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे.
सध्या लक्ष्मी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून घुमटमाळ येथे पाणी नेण्यासाठी नवी जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. हे काम 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असून ही जलवाहिनी कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाते. त्यामुळे जलवाहिनी घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत 4 कि. मी. खुदाई करावी लागणार आहे.
त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे परवानगी मागण्यात आली असून बोर्डाने परवानगीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे धाडला आहे. तथापि या जलवाहिनीसाठी अनामत रक्कम भरण्याची व दरवर्षी परवाना शुल्क म्हणून 53 लाख 85 हजार रुपये अदा करण्याची अट कॅन्टोन्मेंट बोर्डाने घातली आहे. त्यामुळे अनामत रक्कम म्हणून सुमारे 70 लाख रुपये बोर्डाकडे भरावे लागणार आहेत.
शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट एल अँड टी कंपनीकडे आहे. त्यामुळे ही अनामत रक्कम व परवाना शुल्क कोणी भरावे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण एल अँड टी कंपनी कंत्राटदार असल्यामुळे ही रक्कम महापालिकेला म्हणजे शासनालाच भरावी लागणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने जलवाहिनी घालण्यासाठी अनामत रक्कम व परवाना शुल्काची अट घातल्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जलवाहिनी घालण्याचे काम थांबले आहे.
परिणामी शहरात विशेष करून दक्षिण भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील 4 कि. मी. जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण झाले तर घुमटमाळसह बेळगाव दक्षिण भागातील नव्या चार जलकुंभांना जलद पाणीपुरवठा होणार आहे. त्या जल कुंभांमधून शहराच्या दक्षिण विभागात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.
दरम्यान, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने शुल्क आकारणीचा निर्णय घेतला असला तरी 4 कोटी रुपये पाणीपट्टी बोर्डाकडे थकीत आहे. त्यासाठी बोर्डाचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याखेरीज कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचऱ्यावरील प्रक्रिया ही थांबवली जाणार आहे. मात्र असे झाल्यास महापालिका आणि कँटोन्मेंट बोर्ड यांच्यातील वाद भविष्यात चिघळण्याची शक्यता आहे.