बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनवेळा अनावरण करूनही जे वातावरण आणि जी शिवभक्ती निर्माण करता आली नाही ती आज समितीच्या केवळ एका हाकेवर मराठी अस्मिता जपण्यासाठी निर्माण झाली आहे.
शनिवारी सायंकाळपासूनच समिती नेत्यांसह कार्यकर्ते, स्वयंसेवक साहित्यासह राजहंसगडावर रवाना झाले आहेत. काल सायंकाळपासूनच राजहंसगडावर दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक कार्यक्रमाची तयारी सुरु झाली आहे.
आज होणाऱ्या महाप्रसादासाठी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणात शिधा जमा झाला असून आज सकाळपासून येळ्ळूर विभाग समितीने महाप्रसादासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे
रायगडावरील के. एन. पाटील गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक विधीला सुरुवात झाली असून हळूहळू राजहंसगडावर गर्दीदेखील वाढत असलेली पाहायला मिळत आहे. सकाळी सुरु झालेल्या पालखी आणि शोभायात्रेत हलगी वादनाने साऱ्याचे लक्ष वेधून घेतले.
शालेय विद्यार्थिनींच्या पोवाड्याने आणि घोषणांनी परिसर शिवमय झाला असून पारंपरिक वेशात सहभागी झालेल्या मराठी भाषिकांमुळे राजहंसगडावर शिवचैतन्य पसरले आहे.