बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. परंतु ‘नाव मोठे, लक्षण खोटे’अशी अवस्था बेळगाव स्मार्ट सिटीची झाली आहे, हे आता जगजाहीर आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःची जाहिरातबाजी करण्यासाठी संपूर्ण शहरात अनेक इच्छुक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवख्यांच्या बॅनरबाजीला ऊत आला होता.
बेळगावची स्वतंत्र अशी ओळख आहे. येथील निसर्गसंपदा, ऐतिहासिक आणि ब्रिटिशकालीन वास्तू यासह अनेक गोष्टींमुळे बेळगावच्या सौंदर्यात भर पडत आली आहे. मात्र राजकारण्यांच्या आणि संघ-संस्थांच्या बॅनरबाजीमुळे शहराचे सौंदर्य पूर्णपणे झाकोळून रस्ते भकास दिसत होते.
बेळगावमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील अर्धवट कामे, ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम, विकासाच्या नावावर शहराचे सुरु असलेले विद्रुपीकरण या आणि अशा अनेक कारणांमुळे शहराला देण्यात आलेले भकास रूप आणि त्यातच निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर आलेला बॅनरचा बहर! यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात आणखीनच भर पडली.
बुधवारी जाहीर झालेल्या आचारसंहितेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. आणि त्यानंतर शहरात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय फलक झाकण्याचे काम हाती घेण्यात आले. यामुळे बेळगावच्या रस्त्यांनी एकदाचा मोकळा श्वास घेतला आहे.
बेळगावमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या राजकीय फलकांना नागरिक देखील वैतागले होते. जनता आता जागरूक झाली आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या स्वार्थीपणाची आणि सत्तापिपासूपणाची त्यांना चांगलीच जाणीव झाली आहे.
त्यामुळे रस्त्यावरील राजकीय फलक पाहून अनेक नागरिकांनी राजकारण्यांच्या नावे शिमगाही साजरा केला. बेळगावमध्ये बॅनरबाजीला आलेला ऊत आणि यामुळे बेळगावचे झालेले भकास रूप आता काही काळासाठी दूर झाले असून बेळगावच्या रस्त्यावर फिरताना आता मन प्रसन्न वाटणार आहे!