शिष्य : गुरुजी, खरा नेता कोण?
गुरुजी : जो आपल्या समाजासाठी, सभोवतालच्या भल्यासाठी प्रयत्न करतो, तो चांगला नेता!
शिष्य : गुरुजी, चांगला कार्यकर्ता कोण?
गुरुजी : ज्याला स्वतःला जनसामान्यांचा पाठिंबा लाभेल, असा विश्वास नसतो , तरीही तो सामाजिक कार्यात अग्रेसर राहू इच्छितो, त्यावेळी तो कोणत्या तरी नेत्याच्या मागे राहुन कार्य करतो. तो कार्यकर्ता!
शिष्य : गुरुजी, मग खरा उमेदवार कोण?
गुरुजी : ज्याला स्वतःला मत पडेल, समाजात स्थान आहे, आपल्याला जनतेचा पाठिंबा आहे असे वाटते तो उमेदवार!
शिष्य : मग खोटा उमेदवार कोण?
गुरुजी : जो दुसऱ्याला निवडणुकीत पाडवण्यासाठी, आपल्या समाजाचे हीत न जोपासता, आपला खिसा भरण्याचा प्रयत्न करतो तो खोटा उमेदवार!
शिष्य : मग गुरुजी, खोटा नेता कुणाला म्हणतात?
गुरुजी : जो आपल्या समाजाचे अहित चिंतितो, जो आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडवण्यासाठी प्रयत्न करतो, दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा अशी रचना करतो. दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला ‘अभय’ देतो, त्याला खोटा नेता म्हणतात! वत्सा, तुझ्या डोक्यात काही ”प्रकाश’ पडला का? का अजून तुझे मन ‘मरगळलेलेच’ आहे? आता तुझ्या मनावरचे मळभ दूर झाले का?
शिष्य : होय गुरुजी! आता तुमच्या या अगाध ज्ञानाने मी पावन झालो! माझे मन या ज्ञानग्रहणाने उल्हसित झाले! ही ज्ञानाची ”सरिता’ माझ्या घरापर्यंत पोहोचली.. उद्या मी असाच आणखी एक प्रश्न घेऊन तुमच्याकडे येईन!
गुरुजी : वत्सा, मी तुझ्यासाठीच आहे!
क्रमशः …