उन्हाळा जवळ येत असल्यामुळे उष्मा वाढू लागला असून स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हा प्रत्येकासाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. दुर्दैवाने यंदा पाण्याची समस्या अपेक्षेपेक्षा लवकर उद्भवली असून एल अँड टी कंपनीच्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे फेब्रुवारीपासून ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. ही परिस्थिती उद्भवण्यास कमी पावसामुळे मागील वर्षाच्या तुलनेत सध्या खालावलेली राकसकोप जलाशयातील पाणी पातळीही कारणीभूत आहे.
विशेष म्हणजे राकसकोप पाणीपुरवठा योजने मागचे मास्टरमाइंड असलेले डॉ एम. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या अहवालाच्या प्रस्तावनेमध्ये बेळगावच्या पाणी टंचाई समस्येचा अंदाज वर्तविला होता. तसेच विहिरींच्या साखळीच्या माध्यमातून बेळगावचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला जाऊ शकतो असा सल्लाही दिला होता. राकसकोप पाणीपुरवठा योजना अस्तित्वात येण्यापूर्वी बेळगाव शहर विहिरीच्या पाण्यावरच अवलंबून असायचे. या विहिरींपैकी बहुतांश विहिरी या ब्रिटिश काळात म्हणजे सुमारे 100 ते 200 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या.
1964 मध्ये बेळगावमध्ये पाईपद्वारे पाणी उपलब्ध झाले तरी घरामध्ये पाईपलाईनचे नळाद्वारे येणारे पाणी वापरण्याबद्दल लोकांमध्ये अनिश्चितता होती. त्यांना स्वतःच्या विहिरींचेच पाणी योग्य वाटत होते. लोकांनी नळाचे पाणी वापरावे यासाठी बरेच प्रयत्न करून देखील विहिरीच्या पाण्याला पसंती देणाऱ्या नागरिकांची द्विधा मनस्थिती कायम होती. तेंव्हा तत्कालीन विभागीय आयुक्तांना या समस्येवर एक तोडगा सुचला. त्यांनी विहिरी बंद झाल्या तर लोक पाईपलाईनचे नळाचे पाणी वापरू लागतील अशी अपेक्षा बाळगून विहिरी बंद करण्याचा आदेश काढला. मात्र पुढे 50 वर्षानंतर सरकारला पुन्हा त्याच विहिरी खुल्या करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले.
भू-जल संसाधन मूल्यांकन 2022 च्या माहितीनुसार जिल्ह्यातील भू- जल संसाधन स्थिती पुढील प्रमाणे आहे. अथणी -मध्यम गंभीर, बैलहोंगल -अति शोषित, बेळगाव -सुरक्षित, चिकोडी -मध्यम गंभीर, गोकाक -मध्यम गंभीर, हुक्केरी -मध्यम गंभीर, कागवाड -गंभीर, खानापूर -सुरक्षित, कित्तूर -सुरक्षित, निपाणी -सुरक्षित, रायबाग -सुरक्षित, रामदुर्ग -सुरक्षित, सौंदत्ती -गंभीर, यरगट्टी -मध्यम गंभीर. या पार्श्वभूमीवर स्थानिक पुढाकारातून राबविला जाणारा खुल्या विहिरी प्रकल्प (ओपन वेल प्रोजेक्ट) उल्लेखनीय असून त्यामुळे पाण्याची समस्या निकालात निघण्याबरोबरच सार्वजनिक क्रांती घडू शकते. मात्र दुर्दैवाने हे करण्याऐवजी सर्व लक्ष कुपनलिकांवर (बोअरवेल) केंद्रित केले जात आहे. सरकार आणि रहिवासी नागरिक स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात कुपनलिका खोदत आहेत.
स्थानिक समुदाय एकत्र येऊन कशाप्रकारे स्थानिक आव्हानांवर मात करू शकतो याचे ओपन वेल प्रोजेक्ट हे एक ठळक उदाहरण आहे. या नव्या स्थानिक उपक्रमाच्या पुढाकारामध्ये जनसेवेत रूपांतर करण्याची आणि टायर टू शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्याची क्षमता आहे.
मात्र यश मिळवूनही या प्रकल्पासमोर बोअरवेलचे नवे आव्हान उभे आहे. तथापि बेळगाव शहराची एकंदर परिस्थिती पाहता डॉ एम. विश्वेश्वरय्या यांचा सल्ला शिरोधार्य म्हणून ‘ओपन वेल प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज बनली आहे.