कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला (आप) मोठा हादरा बसला असून बेंगलोरचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्करराव यांनी पक्षाला सोडचिट्टी देत राज्यातील सत्ताधारी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
भास्करराव यांनी आज बुधवारी 1 मार्च रोजी भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी पोलीस आयुक्त भास्करराव यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘आप’मध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो. आपचा विकास आता होऊ शकत नाही.
सीबीआयने काल अबकारी घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. त्याचबरोबर माजी आरोग्य मंत्री सत्तेंद्र जैन हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणी तुरुंगात आहेत. आपच्या या दोन मंत्र्यांचे तुरुंगात जाणे लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले.
मी पंतप्रधान मोदींपासून खूप प्रेरित आहे. पंतप्रधानांची काम पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केला. मला वाटतं की मी भाजपमध्ये अधिक योगदान देऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीने मला पक्षात येण्याची प्रेरणा दिली, असेही भास्करराव यांनी स्पष्ट केले.
माजी पोलीस आयुक्त भास्कर राव 11 महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी 4 एप्रिलला आम आदमी पक्षामध्ये दाखल झाले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचे सदस्यत्व दिले होते. आता भास्कर राव यांनी पक्ष सोडणे हा कर्नाटकात ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे.