बेळगाव लाईव्ह : संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या राकसकोप जलायशयातील पाण्याचा साठा घेतला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बेळगावकरांना पाणी पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेळगावकरांना पाण्याचा जपून वापर करायचा आहे. राकसकोप जलाशयातील पाणी साठा घातल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळ आणि एल अँड टी कंपनीने एका पत्रकाद्वारे दिली आहे.
मागील वर्षीपेक्षा चार फूट पाणी साठा राकसकोप जलाशयात कमी झाला असून येणाऱ्या काळात बेळगावकरांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहे.
२४ तास पाणी पुरवठा होणाऱ्या प्रभागामध्येही पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. सध्या शहरातील काही प्रभागात दार ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. मात्र आता यापुढे ५ ते ६ दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे.
राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा मंडळ तसेच एल अँड टी कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.