बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वारकऱ्यांची रेल्वेसेवेबाबतची मागणी भजनाच्या माध्यमातून मांडत आज दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे प्रिन्सिपल चीफ कमर्शिअल मॅनेजर ए. एस. राव यांना बेळगाव जिल्हा वारकरी संघातील वारकरी आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी यापूर्वी बेळगावमधून प्रत्येक दिवशी २ वेळा रेल्वे सेवा उपलब्ध होती. मात्र कोविड दरम्यान हि सेवा स्थगित करण्यात आली आहे. पूर्वी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात रेल्वे सेवा सुरु होती.
मात्र कोरोनानंतर आठवड्यातून केवळ एकच दिवस हि सेवा पुरविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी बेळगावमधून जवळपास ३ ते ४ वेळा वारकरी मंडळी पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जातात. याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील एकादशीच्या निमित्तानेही अनेक वारकरी पंढरपूरला जातात. मात्र दररोज सुरु असणारी बेळगाव-पंढरपूर हि रेल्वेसेवा बंद करण्यात आल्याने वारकरी मंडळींची गैरसोय होत आहे.
मागील अडीज वर्षांपासून वारकरी मंडळींना या असुविधेमुळे गैरसोय निर्माण होत असून पूर्वीप्रमाणेच रेल्वेसेवा सुरळीत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी बेळगाव जिल्हा वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली महाराज, रमाकांत कोंडुसकर, सुनील आपटेकर, द-प रेल्वे विभागाच्या असिस्टंट कमर्शियल मॅनेजर निवेदिता, स्टेशन मास्टर, हभप सं. बं. हणमंताचे, संतराम पाटील, ज्ञानेश्वर पवार, पांडुरंग जाधव आदींसह वारकरी मंडळी उपस्थित होती.