बेळगाव महापालिकेच्या नूतन नगरसेवकांचा शपथविधी होण्याआधीच त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून मनपा आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांनी बेळगाव दक्षिण विभागासाठी 10 कोटी रुपये तर उत्तर विभागाला 9 कोटी रुपयांचे ‘वॉर्ड बजेट’ मंजूर केले आहे.
मागील सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता असताना सर्वसाधारण बैठकीत ठराव करूनही नगरसेवकांना वार्ड बजेट देण्यात आले नव्हते. मात्र यावेळी सभागृह अस्तित्वात येण्याआधीच आयुक्त डाॅ. घाळी यांनी वॉर्ड बजेट मंजूर केले आहे.
त्यांनी प्रारंभी केवळ शहराच्या दक्षिण विभागातील नगरसेवकांसाठी 10 कोटी रुपयांचे वॉर्ड बजेट मंजूर केले होते. या 10 कोटी रुपयांचा विनियोग आराखडा तयार करण्याचे कामही बांधकाम विभागाने सुरू केले होते. मात्र बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना याची माहिती मिळताच त्यांनी आयुक्तांची भेट घेतली व वॉर्ड बजेट बाबत चर्चा केली. त्यामुळे आता उत्तर विभागासाठीही 9 कोटी रुपयांचे वॉर्ड बजेट मिळणार आहे.
घरपट्टी आणि अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून महापालिकांना मिळणारा निधी शहरातील विकास कामांसाठी खर्च केला जातो. या निधीतून प्रत्येक प्रभागासाठी ठराविक रक्कम राखीव ठेवली जाते. या रकमेतून कोणती विकास कामे केली जावीत याबाबत नगरसेवकांनाच विचारणा केली जाते.
मागील सभागृहात निधी मंजूर करण्याचा ठराव संमत झाल्यानंतर देखील नगरसेवकांना निधी मिळाला नव्हता. त्यावरून सर्वसाधारण बैठकीत आयुक्त व नगरसेवकांमध्ये वादही झाला होता. मात्र यावेळी नव्या नगरसेवकांना लॉटरी लागली असून महापालिकेतील अधिकृत प्रवेश होण्याआधीच त्यांना निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे प्रारंभी गुपचूप केवळ शहराच्या दक्षिण विभागातील नगरसेवकांसाठीच 10 कोटी रुपयांचे वॉर्ड बजेट मंजूर केले होते.
मात्र अल्पावधीत ‘वॉर्ड बजेट’चे बिंग फुटल्यामुळे आता शहर उत्तर विभागातील नगरसेवकांसाठी देखील 9 कोटी रुपये निधी द्यावा लागला आहे. एकंदर शहरातील सर्व प्रभागांसाठी एकूण 19 कोटी रुपयांचे वॉर्ड बजेट मंजूर झाले आहे.