जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांकडून नागरिकांना रक्तदान करण्याचे सातत्याने आवाहन केले जात असले तरी मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात रक्त संकलित होते. त्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने पुढाकार घेत रक्तदान करण्यासाठी विशेष फिरत्या वाहनाची सोय केली आहे.
बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने उपलब्ध केलेल्या या विशेष फिरत्या वाहनाच्या माध्यमातून विविध गावात जाऊन रक्त संकलन केले जात आहे. त्याचबरोबर रक्तदान करण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जात आहे.
रक्तदानासाठी तैनात करण्यात आलेल्या या विशेष फिरत्या वाहनात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असून प्रत्येक वाहनात दोन वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. या वाहनात एका वेळी दोघेजण रक्तदान करू शकतात.
आरोग्य खात्याच्या माहितीनुसार कोरोना काळात अनेकांना रक्ताच्या तुटवड्यामुळे जीव गमवावा लागला. तेंव्हापासून या खात्याने रक्त संकलन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सध्या फक्त कांही ठिकाणी रक्त संकलन करण्यासाठी विशेष वाहनाची सोय आहे. मात्र पुढील काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. सदर वाहनाच्या माध्यमातून सध्या दररोज 5 ते 6 जण रक्तदान करत आहेत.