छावणी परिषद अर्थात कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी काल सोमवारी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार छावणी सीमा निवडणूक नियमावली 2007 अंतर्गत येत्या 30 एप्रिलला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणूका होणार असून 1 मे रोजी मत मोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सात प्रभागांमध्ये 7 जागांसाठी निवडणूक रंगणार असून यातील प्रभाग क्रमांक 1, 2, 3 व 5 हे सामान्य, 4 व 6 हे प्रभाग महिलांसाठी राखीव आणि क्रमांक 7 चा प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक सुमारे 8 वर्षानंतर होत आहे. आगामी निवडणुकीसाठी येत्या 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदार यादीत नांव नोंद करण्यासाठी बेळगाव कार्यालयात अर्ज करता येईल. मतदार यादीत समाविष्ट केलेली नावे 16 मार्च रोजी प्रसिद्ध केली जातील.
कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुकीसाठी येत्या 17 ते 21 मार्च या कालावधीत सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 4:30 या वेळेत उमेदवारी अर्ज उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर 24 ते 25 मार्च या कालावधीत सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करता येतील. निवडणूक अधिकारी किंवा त्यांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून नामांकन पत्रांची छाननी 29 मार्चला सकाळी 11 वाजेपर्यंत होणार आहे.
त्यानंतर 6 एप्रिल रोजी निवडणूक चिन्ह, तारीख व वेळ दिली जाईल. कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी एकूण 198 निवडणूक चिन्हे जारी करण्यात आले असून त्यातील चिन्हे निवडण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडणुकीचे मतदान 30 एप्रिलला होणारा असून मतमोजणी व निकाल 1 मे रोजी जाहीर केला जाईल.