Saturday, January 4, 2025

/

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल सोसायटी एक विश्वासार्ह पतसंस्था

 belgaum

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने गेल्या आपल्या 50 वर्षाच्या यशस्वी वाटचालीद्वारे एक विश्वासार्ह पतसंस्था म्हणून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा 53 व्या वर्षी या सोसायटीला 89 लाख 59 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे.

बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रातील विश्वासार्ह पतसंस्था असा सन्मान प्राप्त केलेल्या बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना 1970 साली झाली. शहरातील जुन्या पुणे -बेंगलोर रोडवर त्यावेळी मोटार बॉडी बिल्डिंग व त्याला पूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात होता.

श्री शिवजयंती उत्सव हे बेळगावचे पूर्वीपासून मोठ्या आकर्षण आहे. जिजामाता चौकातील शिवाजी कंपाउंडमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने त्याकाळी कांही व्यावसायिक एकत्र आले. याच सुमारास तत्कालीन कर्नाटक राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यात सहकारी तत्त्वावर औद्योगिक पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या व्यावसायिकांनी आपली पतसंस्था स्थापन करून व्यवसाय वृद्धिंगत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते कै. लक्ष्मण (पामा) आजगावकर, माजी आमदार कै. बापूसाहेब महागांवकर व मराठा बँकेचे संचालक कै. रामचंद्रराव (तात्या) ताशीलदार यांनी पुढाकार घेतला आणि आवश्यक कागदपत्रे तयार केली. तसेच भाग भांडवल जमा करण्यासाठी नोंदणी करून घेतली.

सोसायटीच्या पहिल्या कार्यकारणीत वसंतराव परुळेकर हे संस्थापक -चेअरमन आणि अनंत पावशे हे व्हाईस चेअरमन होते. संचालक मंडळात यशवंतराव हंगेरगेकर, राणोजी रेडेकर, वामनराव हलगेकर, धुंडीराज डोंबले, यशवंतराव किल्लेकर, मारुतीराव चौगुले, वामनराव मोदगेकर व अर्जुनराव जाधव यांचा समावेश होता. सुरुवातीला सोसायटीचे कार्यालय संस्थापक संचालक यशवंतराव हंगीरगेकर यांच्या यशवंत टिंबर डेपो च्या जागेत होते. त्यानंतर शिवाजी कंपाउंडमधील एका इमारतीत जागा भाड्याने घेऊन तेथे कार्यालय सुरू केले. पुढे सोसायटीचा व्याप वाढला आणि जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे फुलबाग गल्ली येथे स्वतःच्या जागेत 23 लाख रुपये खर्च करून भव्य इमारत बांधण्यात आली आणि तेथे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. आता शहरातील उद्यमबाग व ऑटोनगर या दोन औद्योगिक वसाहतीमध्ये सोसायटीच्या शाखा सुरू आहेत. सोसायटी स्थापन झाली त्यावेळी सभासद संख्या 105, भाग भांडवल 13070 तर खेळते भांडवल 29465 रुपये होते.Rural bank

आता सुवर्ण महोत्सव साजरा झाल्यानंतर यंदा सोसायटी 53 वर्षात पदार्पण करत असून 31 जानेवारी 2023 अखेर सोसायटीची सभासद संख्या 2828 आहे. भाग भांडवल 1 कोटी 68 लाख 32 हजार रुपये, राखीव व इतर निधी 8 कोटी 72 लाख 65 हजार रुपये, ठेवी 46 कोटी 95 लाख 90 हजार रुपये, खेळते भांडवल 60 कोटी 92 लाख 58 हजार रुपये असून 33 कोटी 21 लाख 14 हजार रुपयांची विविध कर्जे देण्यात आली आहेत. यंदाच्या अहवाल साली सोसायटीला 89 लाख 59 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सोसायटीने गेल्या 50 वर्षात केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे हे द्योतक आहे. या सोसायटी करून कर्ज घेऊन असंख्य कामगार आज विविध व्यवसायात मालक झाले आहेत. याचबरोबर पतहिनांना कर्ज पुरवठा करून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे कार्य या सोसायटीने केले आहे.

बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने केवळ व्यवहार पाहिला नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. लातूर येथे झालेल्या विनाशकारी भूकंपातील अपवादग्रस्तांना तसेच घटप्रभा येथील कर्नाटक आरोग्यधाम, बेळगावातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, वरेकर नाट्य संघ, मराठा समाज सुधारणा मंडळ व इतर संस्थांना सोसायटीने आर्थिक मदत केली आहे. तसेच दहावी, बारावी व पदवी परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुलांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याद्वारे प्रोत्साहित केले जाते. सभासदांच्या आरोग्याची काळजी घेताना या सोसायटीकडून गंभीर स्वरूपाच्या आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाते. सोसायटीच्या मुख्य कार्यालयात ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सोसायटीच्या या कार्याची दखल घेऊन बेळगाव जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाप्रसंगी उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या हस्ते या सोसायटीला रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. सुवर्ण महोत्सवानंतर सध्या रमेश मोदगेकर (चेअरमन) आणि रघुनाथ पाटील (व्हाईस चेअरमन) यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद पावशे, मारुतीराव सदावर, कृष्णराव मोदगेकर, यल्लाप्पा चौगुले, उदय किल्लेकर, शिवाजी शहापूरकर, सौ. नंदा बिर्जे व श्रीमती निर्मला कामुले हे संचालक कार्यरत आहेत. त्यांना व्यवस्थापक जयवंत खन्नूकर आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.