शहरातील भटक्या कुत्र्यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या व उपद्रव लक्षात घेऊन महापालिकेने आता दररोज किमान 20 कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर आणि परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे कळप दिसून येत असल्याने नागरिकात दहशतीचे वातावरण असते. गेल्या कांही दिवसात कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. वडगाव येथे तर भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीवही गमवावा लागला होता. वडगाव, समर्थनगर अनगोळ आदी भागात 40 हून अधिक कुत्र्यांचे कळप सातत्याने फिरत असल्याचे पहावयास मिळतात.
गेल्या दोन-तीन दिवसात तर या कुत्र्यांनी हैदोस घातला असून ही कुत्री लहान मुले व पाळीव कुत्र्यांवर हल्ला करत आहेत. परिणामी लहान मुलांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकंदर सध्या भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला असून सदर कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. बेळगाव महापालिकेने भटक्या कुत्र्यांची फक्त नसबंदी करून न थांबता ज्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे, असे मतही व्यक्त केले जात आहे.